IND A vs SLA: श्रीलंकेच्या हातातून विजय हिसकावला! अर्शद खानने एकाच षटकात फिरवला सामन्याचा पासा; भारताचा दणदणीत विजय

प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत 6 बाद 277 धावांचा आव्हानात्मक टप्पा गाठला होता.

IND A vs SLA: श्रीलंकेच्या हातातून विजय हिसकावला! अर्शद खानने एकाच षटकात फिरवला सामन्याचा पासा; भारताचा दणदणीत विजय

IND A vs SLA: क्रीडा रसिकांच्या श्वास रोखून धरणाऱ्या तिरंगी मालिकेतील पहिल्याच एकदिवसीय सामन्यात 'इंडिया ए' संघाने श्रीलंकेचा 8 धावांनी पराभव करत स्पर्धेत धडाकेबाज सुरुवात केली आहे. प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत 6 बाद 277 धावांचा आव्हानात्मक टप्पा गाठला होता. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर असतानाही 48.5 षटकांत 269 धावांवर गारद झाला. शेवटच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट पुनरागमनामुळे हा विजय सुकर झाला. या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या ऋतुराज गायकवाडला त्याच्या शानदार शतकासाठी 'सामनावीर' (Player of the Match) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सुरुवातीच्या धक्क्यानंतर गायकवाड आणि टिळक वर्माची 150 धावांची भागीदारी

या सामन्यात भारताची सुरुवात काहीशी खराब झाली. सलामीवीर वैभव केवळ 12 चेंडूंत 14 धावा करून बाद झाला, तर यष्टिरक्षक प्रभसिमरन सिंगला 11 चेंडूंत अवघ्या 2 धावा करता आल्या. सुरुवातीलाच 2 महत्त्वाचे बळी गेल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने प्रियांश आर्याच्या साथीने डाव सावरण्यास सुरुवात केली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 53 चेंडूंत 53 धावांची भागीदारी केली. मात्र प्रियांश 32 चेंडूंत 32 धावा काढून माघारी परतला.

यानंतर गायकवाड आणि टिळक वर्मा यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेत चौथ्या विकेटसाठी 150 धावांची मजबूत भागीदारी रचली. गायकवाडने 114 चेंडूंत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 101 धावांची शतकी खेळी केली. दुसऱ्या बाजूने टिळक वर्माने 97 चेंडूंत 60 धावांचे योगदान दिले. डावाच्या शेवटच्या टप्प्यात बडोनीने 18 चेंडूंत 24 धावा आणि सूर्यांश शेगडेने 14 चेंडूंत 26 धावांची आक्रमक खेळी केल्याने भारताला 277 धावांपर्यंत पोहोचता आले.

कर्णधार सहन अरच्चिगेची 74 धावांची झुंजार खेळी
 
भारताने दिलेल्या 278 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांवर दबाव आणला. यष्टिरक्षक निरोशन डिकवेला (47 धावा) आणि अविष्का फर्नांडो (45 धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी करून संघाला भक्कम पाया रचून दिला. त्यानंतर आलेल्या सदीरा समरविक्रमाने 46 धावा करत डाव पुढे नेला. श्रीलंकेचा कर्णधार सहन अरच्चिगे याने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते. त्याने 72 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांसह सर्वाधिक 74 धावा फटकावल्या. एका टप्प्यावर श्रीलंकेचा विजय अगदी सहज वाटत होता.

हेही वाचा – FIFA World Cup 2026 : फुटबॉलप्रेमींसाठी पर्वणी! अवघ्या दोन दिवसांत सुरू होणार फिफा विश्वचषकाचा थरार; संघ, स्पर्धा, वेळापत्रक… जाणून घ्या सविस्तर माहिती फक्त एका क्लिकवर

शेवटच्या षटकात अर्शद खानची कमाल 
  
विजयासाठी अवघ्या काही धावांची गरज असताना भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी मैदानात कमाल केली. डावातील 49 वे षटक टाकत असलेल्या अर्शद खानने सामन्याचे चित्रच पालटून टाकले. या अत्यंत महत्त्वाच्या षटकात त्याने भेदक गोलंदाजी करत श्रीलंकेचे 2 महत्त्वाचे बळी घेतले, तर याच षटकात एकूण 3 फलंदाज बाद झाले. यामुळे संपूर्ण 50 षटके खेळण्यापूर्वीच श्रीलंकेचा डाव 269 धावांवर आटोपला आणि भारताने 8 धावांनी एक रोमांचक विजय आपल्या खिशात घातला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number