Naseem Shah House Firing: श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका सुरू होण्याच्या आदल्या दिवशी पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज नसीम शाह याच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. हा प्रकार खैबर पख्तूनख्वा प्रांतातील हुजर भागात घडला असून, सुदैवाने नसीम शाहचे कुटुंबीय या घटनेत सुरक्षित बचावले आहेत. स्थानिक वृत्तांनुसार, हल्ल्यात घराचे मोठे नुकसान झाले आहे. गोळीबारामुळे खिडक्या, मुख्य गेट आणि पार्किंग परिसराचे नुकसान झाले. पोलिसांनी या घटनेनंतर तात्काळ कारवाई करत पाच संशयितांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच, नसीम शाहच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, हल्ल्याच्या वेळी नसीम शाह घरी नव्हता. तो त्या वेळी पाकिस्तान क्रिकेट संघासोबत रावळपिंडीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेच्या तयारीत होता. नसीमचा समावेश 11 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत करण्यात आला आहे.
हल्ल्यावेळी कुटुंब घरातच होते
नसीमचे कुटुंबीय घरात उपस्थित होते, मात्र सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
हेही वाचा – New Mega Sports City in Delhi: क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय! दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम पाडणार
दरम्यान, 11 नोव्हेंबर रोजी खेळला जाणारा पहिला एकदिवसीय सामना पाकिस्तान क्रिकेट संघ आज श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळेल. पहिला एकदिवसीय सामना 11 नोव्हेंबर रोजी रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. उर्वरित दोन एकदिवसीय सामने देखील त्याच मैदानावर खेळवण्याचे नियोजित आहे. दुसरा एकदिवसीय सामना 13 नोव्हेंबर रोजी आणि तिसरा 15 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. यानंतर, एक टी-20 त्रिकोणी मालिका देखील खेळवली जाईल, ज्यामध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका व्यतिरिक्त झिम्बाब्वे संघाचाही समावेश असेल.