Thane Crime : ठाणे महापालिका प्रशासनातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली आहे. महापालिकेच्या हकीम अजमल खान रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर डॉ. शारमिंग डिंगा यांनी आपल्या राहत्या इमारतीवरून उडी मारून जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेमुळे ठाणे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
प्राप्त माहितीनुसार, डॉ. शारमिंग डिंगा या ठाण्यातील 'ग्रेस स्कोअर' इमारतीत वास्तव्यास होत्या. आज (बुधवारी) सकाळी त्यांनी राहत्या घराच्या 6 व्या मजल्यावरून खाली उडी मारली. हा आघात इतका भीषण होता की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा – NEET Paper Leak Case: एकाच कुटुंबातील 5 जण डॉक्टर कसे झाले? NEET घोटाळ्याचे धक्कादायक धागेदोरे समोर
तपासाचे चक्र सुरू
पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर डॉ. डिंगा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला आहे. डॉ. डिंगा यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यांच्याकडे कोणतीही चिठ्ठी सापडली आहे का, याचाही पोलीस शोध घेत आहेत. मुंब्रा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस त्यांच्या कुटुंबीयांची आणि सहकाऱ्यांची चौकशी करत आहेत. एका कर्तव्यदक्ष महिला डॉक्टराने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने ठाणे महापालिका प्रशासकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.