Ketan Agrawal Case : ‘केतनला मारायचं नव्हतं तर कायमचं…’; तपासात सिया व चेतनचा धक्कादायक कट उघड

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, केतनला थेट संपवण्याचा आरोपींचा सुरुवातीला विचार नव्हता; तर त्याला केवळ गंभीर दुखापत पोहोचवणे हा त्यांचा प्राथमिक प्लान होता.

Ketan Agrawal Case : ‘केतनला मारायचं नव्हतं तर कायमचं…’; तपासात सिया व चेतनचा धक्कादायक कट उघड

Ketan Agrawal Case : पुण्यातील लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडात दररोज नवे आणि थक्क करणारे खुलासे समोर येत आहेत. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, केतनला थेट संपवण्याचा आरोपींचा सुरुवातीला विचार नव्हता; तर त्याला केवळ गंभीर दुखापत पोहोचवणे हा त्यांचा प्राथमिक प्लान होता. या कारस्थानासाठी कोणाला कंत्राट द्यायचे, यावर मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात सविस्तर चर्चा झाली होती.

संशय टाळण्यासाठी बनावट अपघात आणि लुटीची योजना 
संशयाची सुई स्वतःवर येऊ नये यासाठी केतनवर हल्ला करणे, त्याला लुटणे किंवा त्याचा भीषण रस्ता अपघात घडवून आणणे, अशा वेगवेगळ्या पर्यायांवर दोन्ही आरोपी विचार करत होते. विवाह ठरल्यानंतर बाली येथे होणारा प्री-वेडिंग सोहळा कोणत्याही परिस्थितीत उधळून लावण्यासाठी हा सर्व खटाटोप रचला गेला होता. दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणातील दोन्ही प्रमुख आरोपी सिया आणि चेतन यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे.

घटनेचा संपूर्ण घटनाक्रम  

दरम्यान, 18 जून रोजी लोहगडावरील खोल दरीत पाय घसरून केतन अग्रवालचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. सुरुवातीला हा निव्वळ एक दुर्दैवी अपघात असल्याचा बनाव रचण्यात आला होता. मात्र, मृतदेह बाहेर काढणाऱ्या 'शिवदुर्ग रेस्क्यू टीम'ने पोलिसांकडे चौकशीदरम्यान असा अपघात घडण्यावर तीव्र संशय व्यक्त केला आणि तपासाची पहिली ठिणगी पडली. त्यानंतर 21 जून रोजी अंत्यसंस्कार पार पडताच केतनचे नातेवाईक प्रत्यक्ष लोहगडावर पोहोचले. त्यांनी या प्रकरणात अपघाताऐवजी घातपाताची शक्यता व्यक्त करत पोलिसांकडे दाद मागितली.

दरम्यान, संशयित सिया जेव्हा सांत्वनासाठी केतनच्या घरी गेली, तेव्हा केतनची बहीण संजना हिने तिला थेट प्रश्नांच्या घेऱ्यात पकडले. "लोहगडावर नक्की काय घडले? तुम्ही कुठे फोटो काढले? अपघात झाला तेव्हा तू काय करत होतीस?" अशा थेट प्रश्नांचा भडीमार होताच सियाची बोबडी वळली आणि कुटुंबीयांचा संशय अधिकच बळावला. यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत कॉल डिटेल्स (CDR) खंगाळले, ज्यामध्ये चेतन चौधरीचे नाव समोर आले. तांत्रिक विश्लेषणात सिया आणि चेतन यांच्यात एकाच वर्षात 2004 वेळा फोनवरून संभाषण आणि 300 हून अधिक तास चर्चा झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली.

हेही वाचा – CJP's Protest In Mumbai : CJP च्या आंदोलनप्रकरणी मुंबई पोलिसांकडून आंदोलकांविरुद्ध गुन्हे; तर 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल

घटना घडली त्या दिवशी चेतनचे मूळ फोन लोकेशन पुणे शहरातील मार्केट यार्ड दाखवत होते. परंतु, पोलिसांनी लोहगड परिसरातील CCTV फुटेज तपासले असता कडक उन्हात हुडी, मास्क आणि हेडफोन घातलेला एक संशयित तरुण सियाला काहीतरी इशारे करताना आढळून आला. पोलिसांच्या सखोल तपासात चेतनचा हा चालकीचा बनाव उघडा पडला; त्याने स्वतःचा मोबाईल दुकानातील कामगाराकडे ठेवून, त्या कामगाराचा फोन सोबत आणून हे कृत्य केले होते. अखेर 22 जून रोजी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने संशयिताला ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला. अशा प्रकारे या संपूर्ण गुन्ह्याच्या थरारक कटाचा पर्दाफाश झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number