Muktainagar Nagar Panchayat Election Result : जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल समोर आले असून, यामध्ये अनेक अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले आहेत. मुक्ताईनगरमध्ये शिंदे गटाने बाजी मारली असली तरी, धरणगावमध्ये मंत्र्यांनाच मोठा धक्का बसला आहे.
मुक्ताईनगरमध्ये संजना पाटील यांची जबरदस्त कामगिरी
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या सजना चंद्रकांत पाटील यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या भावना महाजन यांचा 2583 मतांनी पराभव केला. या निकालाने केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे, कारण संपूर्ण खडसे कुटुंब या निवडणुकीत प्रतिष्ठेसाठी मैदानात उतरले होते. मात्र, मतदारांनी आमदारांच्या कन्येला कौल देत या ठिकाणी विजयाचा गुलाल उधळला आहे.
दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. आमदार पाटील यांनी ही लढत पाटीलविरुदध्द खडसे अशी केली. मात्र, खडसे कमी पडले असा याचा अर्थ होत नाही, असे रक्षा खडसे म्हणाल्या. भविष्यात मुक्ताईनगरच्या जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करू असे त्या म्हणाल्या.
रणगावमध्ये गुलाबराव पाटलांना घरचा आहेर
राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांना त्यांच्या हक्काच्या धरणगाव बालेकिल्ल्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या ठिकाणी महाविकास आघाडी प्रणित 'धरणगाव शहर विकास आघाडी'च्या उमेदवार लीलाबाई चौधरी यांनी 2417 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. त्यांनी महायुतीच्या उमेदवार वैशाली भावे यांचा पराभव केला. आपल्याच मतदारसंघात मंत्र्यांच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने जळगावच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
पिंपळनेरमध्ये 100 वर्षांनंतर इतिहास घडला
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने आपला झेंडा फडकवला आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी तब्बल 100 वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडणूक पार पडली. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. योगिता चौरे यांनी 7366 मते मिळवून मोठा विजय संपादन केला. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या मंजुळा गावित आणि ललिता गायकवाड यांचा पराभव केला. पिंपळनेरमध्ये भाजपने मिळवलेला हा विजय कार्यकर्त्यांसाठी अत्यंत उत्साहाचा ठरला आहे.
आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेली निवडणूक
या निवडणुकांदरम्यान जळगाव जिल्ह्यात एकमेकांवर वैयक्तिक टीका आणि आरोपांच्या मोठ्या फैरी झाडण्यात आल्या होत्या. मुक्ताईनगरमध्ये तर संघर्ष विकोपाला गेला होता, जिथे खडसे कुटुंबाने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देऊनही त्यांना यश मिळाले नाही. धरणगावमध्ये देखील स्थानिक विकास आणि परिवर्तनाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीने मंत्र्यांच्या सत्तेला आव्हान दिले होते, जे अखेर यशस्वी ठरले.
स्थानिक निकालांचे भविष्यकालीन संकेत
या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की, राज्याच्या राजकारणात जरी युती आणि आघाड्यांचे समीकरण असले, तरी स्थानिक पातळीवर जनतेचा कौल वेगळा असू शकतो. मुक्ताईनगरमध्ये वडिलांची प्रतिष्ठा मुलीने राखली, तर धरणगावमध्ये मंत्र्यांना आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, पिंपळनेरमध्ये भाजपने शतकभरानंतर मिळवलेला विजय हा पक्षाच्या संघटन शक्तीचा विजय मानला जात आहे.