Veteran Singer Asha Bhosle Passes Away : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज (ता. 12 एप्रिल 2026) दुःखद निधन झाले आहे. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे उपचार सुरू असतानाच हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण देशात शोककळा पसरली असून संगीत, मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अंबादास दानवे यांच्याकडून आठवणींना उजाळा
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करताना सांगितले की, लता दीदींनंतर भारतीय संगीताला जागतिक ओळख मिळवून देण्यात आशाताईंचा सिंहाचा वाटा होता. दानवे म्हणाले की, “त्यांच्या आवाजात एक वेगळीच धुंद आणि गोडवा होता. अगदी अलीकडेपर्यंत आम्ही त्यांचे गाणे ऐकत होतो, त्यांच्या जाण्याने केवळ महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण जगाची मोठी हानी झाली आहे.” उद्या शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असून, तिथे शिवसेना (UBT) पक्षाचे प्रमुख आणि सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
9 दशकांचा सुवर्ण प्रवास
आशा भोसले यांची प्रदीर्घ कारकीर्द ही भारतीय संगीताचा एक सुवर्ण इतिहास आहे. प्रत्येक वयातील गाणी त्यांनी आपल्या आवाजाच्या जादूने अजरामर केली आहेत. ब्रिज कॅन्डी रुग्णालयात त्यांना हृदयविकाराच्या झटक्यानंतर वाचवण्याचे प्रयत्न झाले, परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत विश्वात आता एक कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, ज्याची जाणीव प्रत्येक संगीतप्रेमीला होत आहे.
शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
राज्य सरकारने आशा भोसले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे उद्या त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. गायन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा आदर करत संपूर्ण भारतातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यांच्या मागे त्यांची नात जनाई आणि मोठा परिवार असून, संपूर्ण भोसले आणि मंगेशकर कुटुंब सध्या दुःखात बुडाले आहे.
हेही वाचा – Asha Bhosle: आशा भोसले यांचं निधन कशामुळे झालं? जवळच्या व्यक्तीने सांगितलं खरं कारण