शहापूर : शहापूर तालुक्यातील कोठारे घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलेली आहे. कोठोर येथील तीव्र उतारावर जाताच बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत 12 ते 14 प्रवासी जखमी झाले असून, त्यापैंकी 4 ते 5 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. सध्या जखमींना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
कोठारे घाटात धावत्या एसटीचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त एसटी बसची अवस्था ही अत्यंत खराब असल्याचे सांगितले जात आहे. घाटातील तीव्र उतारावर असताना बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा थरारक अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत मदत केली.
हेही वाचा-Dr. Manisha Jejurkar Case Update : डॉ. मनीषा जेजुरकर प्रकरणात नवं वळण; पुन्हा जवळची व्यक्ती अटकेत
धक्क्दायक माहिती समोर
या दरम्यान, याच मार्गावर याआधीही अशाच प्रकारचे पाच ते सहा अपघात झाल्याचा दावा स्थानिकांनी आणि प्रवाशांनीही केली आहे. धोकादायक घाटमार्गावर नादुरुस्त आणि जुन्या बस चालवल्या जात असल्याने अपघातांचा धोका ही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा आरोप होत आहे.
विशेष म्हणजे, विद्यमान आमदारांच्या गावात जाणाऱ्या रस्त्यावरच हा प्रकार घडला असून, नुकताच गाजावाजा करून 5 ते 6 नवीन बस आणल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र,प्रत्यक्षात धोकादायक मार्गांवर सुस्थितीतील बस दिल्या जात नसल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. जखमींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून आणखी काही प्रवाशांना रुग्णालयात आणण्याचे काम सुरू आहे