WPI Inflation: सामान्य जनतेला पुन्हा एकदा तीव्र झळ सोसावी लागणार आहे. बाजारातील वाढत्या किमती लवकरच कमी होतील या आशेवर असलेल्या ग्राहकांना सरकारी आकडेवारीने मोठा धक्का दिला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या अहवालानुसार, घाऊक बाजारातील किमतींचा आलेख वेगाने वर गेला आहे. मे 2026 मध्ये देशाचा ‘घाऊक किंमत निर्देशांकावर’ (WPI) आधारित महागाई दर थेट 9.68 टक्क्यांवर पोहोचला आहे. हा दर चिंताजनक मानला जात आहे, कारण अवघ्या एक महिन्यापूर्वी म्हणजेच एप्रिल 2026 मध्ये हाच दर 8.26 टक्के इतका नोंदवला गेला होता. घाऊक बाजारातील या दरवाढीचा थेट परिणाम येत्या काळात किरकोळ बाजारावर आणि सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होणार आहे.
इंधन, वीज आणि कच्च्या तेलाच्या किमतींमुळे बाजारात तेजी
मे महिन्यातील या प्रचंड महागाईला प्रामुख्याने इंधन, वीज आणि कच्च्या तेलाच्या किमतींमधील विक्रमी वाढ कारणीभूत ठरली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, इंधन आणि विजेचा घाऊक महागाई दर एप्रिलमधील 24.89 टक्क्यांवरून मे महिन्यात तब्बल 30.33 टक्क्यांवर गेला आहे. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या महागाईचा दर एप्रिलमधील 56.31 टक्क्यांवरून मे महिन्यात 61.51 टक्क्यांच्या अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचला आहे.
पश्चिम आशियातील संकट आणि वाहतूक कोंडीचा भारताला फटका
जागतिक स्तरावर, विशेषतः पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधील (Strait of Hormuz) सागरी वाहतुकीची नाकेबंदी यामुळे खनिज तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. भारत आपल्या गरजेचा मोठा हिस्सा याच सागरी मार्गावरून आयात करत असल्याने, कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती वाढल्याचा थेट फटका देशाला बसला. याचाच परिणाम म्हणून मे महिन्याच्या शेवटी भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लीटर 7.50 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली होती.
All India Wholesale Price Index (WPI) inflation for May 2026 is 9.68 per cent on a year-on-year (YoY) basis, compared to 8.26 per cent in April 2026: Ministry of Commerce & Industry — ANI (@ANI) June 15, 2026
वाहतूक खर्च वाढल्याने स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले
इंधनाचे दर कडाडल्यामुळे वाहतूक खर्च वाढला असून त्याचा थेट फटका स्वयंपाकघरातील जीवनावश्यक वस्तूंना बसला आहे. खाद्यपदार्थांचा घाऊक महागाई दर जो एप्रिलमध्ये अवघा 2.43 टक्के होता, तो मे महिन्यात वाढून 3.60 टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय, कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या उत्पादित वस्तूंच्या (Manufactured Goods) महागाई दरातही वाढ झाली असून, तो एप्रिलमधील 6.68 टक्क्यांवरून मे महिन्यात 7.48 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. एकंदरीत, इंधन आणि खाद्यपदार्थांच्या या दुहेरी मारामुळे आगामी काळात सर्वसामान्यांची चिंता अधिक वाढणार आहे.