Kolkata Fire: पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्याच्या दक्षिण उपनगरातील आनंदपूर भागात सोमवारी पहाटे एका सुक्या अन्नाच्या गोदामाला भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, अनेक कामगार अजूनही बेपत्ता आहेत. गोदामाला बाहेरून कुलूप असल्याने आत अडकलेल्यांना बाहेर पडता आले नाही, असा खळबळजनक आरोप स्थानिकांनी केला आहे.
पहाटे 3 वाजता काळ आला धावून
आनंदपूरमधील नझीराबाद येथील गोदामात प्रामुख्याने सुके अन्न, पॅकेज केलेले पदार्थ आणि शीतपेयांच्या बाटल्यांचा साठा होता. पहाटे 3 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली आणि काही वेळातच तिने रौद्र रूप धारण केले. ही आग शेजारील दोन गोदामांमध्येही पसरली. अरुंद गल्ल्यांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यास अडथळे आले, परिणामी आग विझवण्यास विलंब झाला. अग्निशमन दलाच्या 15 पथकांनी शर्थीचे प्रयत्न करून सकाळी 11 वाजेनंतर आग अंशतः आटोक्यात आणली.
‘आम्हाला वाचवा’… अखेरचा तो फोन कॉल
गोदामात अडकलेल्या कामगारांच्या नातेवाईकांनी सांगितलेली माहिती काळजाचा ठोका चुकवणारी आहे. एका पीडित कामगाराच्या नातेवाईकाने सांगितले की, “माझ्या जावयाने पहाटे 3 वाजता फोन करून ‘आम्हाला वाचवा’ अशी विनवणी केली होती. आम्ही तातडीने तिथे पोहोचलो, पण आगीच्या ज्वाळांमुळे काहीच करता आले नाही.” आत अडकलेल्या कामगारांनी बाहेर पडण्यासाठी भिंती तोडण्याचाही प्रयत्न केला, मात्र धुराचे लोट आणि आगीमुळे त्यांचा संपर्क तुटला.
हेही वाचा – Beating Retreat Ceremony: प्रजासत्ताक दिनानिमित्त अटारी बॉर्डरवर ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळा; पाहा खास व्हिडीओ
प्रशासकीय कारवाई आणि बचाव कार्य
राज्याचे ऊर्जामंत्री अरुप बिस्वास आणि अग्निशमन मंत्री सुजित बोस यांनी घटनास्थळी भेट देऊन बचाव कार्याचा आढावा घेतला. “सध्या आमचे प्राधान्य आग पूर्णपणे विझवणे आणि बेपत्ता लोकांचा शोध घेणे हे आहे. हे राजकारण करण्याची वेळ नाही,” असे बिस्वास यांनी स्पष्ट केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅस कटरच्या साहाय्याने इमारतीत प्रवेश केला असून शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.
#WATCH | West Bengal | Fire broke out in a manufacturing unit in Anandapur, Kolkata. Efforts to douse the fire are underway. pic.twitter.com/YhAhHfPlT4 — ANI (@ANI) January 26, 2026
स्थानिकांचा गंभीर आरोप
स्थानिकांच्या दाव्यानुसार, हे गोदाम रात्रीच्या वेळी बाहेरून बंद केले जात असे. आग लागली तेव्हा सुरक्षारक्षक आणि कामगार आतच अडकले होते. बाहेरून कुलूप असल्याने त्यांना पळता आले नाही. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती बारुईपूरचे पोलीस अधीक्षक शुभेंद्र कुमार यांनी व्यक्त केली आहे.