Saptashrungi Devi Temple: साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर चांदीचा मोठा अपहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मंदिराच्या गर्भगृहातील नक्षीकामासाठी वापरण्यात आलेल्या चांदीच्या साठ्यात तब्बल 23 किलोची तफावत आढळून आली असून, या प्रकरणाची आता विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी पातळीवर सखोल चौकशी सुरू झाली आहे. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात आणि भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नोंदी आणि प्रत्यक्ष साठ्यात मोठी तफावत
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराच्या जुन्या नोंदींनुसार 406 किलो चांदी नक्षीकामासाठी वापरण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून प्रत्यक्ष मोजणी केली असता केवळ 383 किलो 703 ग्रॅम चांदीच उपलब्ध असल्याचे समोर आले. यावरून साडेबावीस किलो चांदी गायब असल्याचे स्पष्ट होत असून, सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. नोंदींमधील ही तफावत ट्रस्टच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
रात्रीच्या वेळी चांदी काढल्याने संशयाची सुई
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे सुट्टीवर असताना रात्रीच्या वेळी ही चांदी उतरवण्यात आली. 15 सप्टेंबर 2021 रोजीच्या ठरावानुसार ही प्रक्रिया दिवसा पार पडणे अपेक्षित होते, मात्र मूल्यमापक नसताना ही चांदी हलवण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराबाबत धर्मादाय आयुक्तांना पत्र लिहिल्याचा राग धरून तत्कालीन विश्वस्तांनी दहातोंडे यांच्यावरच निलंबनाची कारवाई केल्याची चर्चा सध्या गडावर रंगली आहे.
प्रशासकीय कारवाई आणि सखोल तपास
विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अपर आयुक्त (महसूल) जितेंद्र वाघ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सहाय्यक जिल्हाधिकारी (कळवण) आणि तहसीलदार कळवण यांना या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. अपहार झालेली रक्कम व्याजासह वसूल करावी आणि जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.