Shalinitai Patil Passes Away: महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक पर्व संपले आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेत्या, माजी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील माहिम येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून त्या आजारपणाशी झुंज देत होत्या, अखेर वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली.
राजकारणातील 'रणरागिणी'चा अस्त
शालिनीताई पाटील यांची ओळख केवळ एका मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अशी नव्हती, तर त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने राजकारणात अढळ स्थान निर्माण केले होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या राजकीय प्रवासात त्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस कुटुंबातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
मराठा आरक्षणाचा बुलंद आवाज
राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आणि आमदार म्हणून काम करताना त्यांनी अत्यंत प्रभावी लोकप्रतिनिधी म्हणून छाप पाडली होती. विशेष म्हणजे, ज्या काळात मराठा आरक्षणाबाबत फारशी चर्चा होत नव्हती, त्या काळात त्यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका मांडली होती. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा गौरव 'महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण' असा केला होता.
मूळ गावी होणार अंत्यसंस्कार
शालिनीताईंचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात आहे. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावीच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध होते. उदयनराजे त्यांना मातेसमान मानत असतं. त्यांनी शालिनीताईंना राजकीय व सामाजिक आयुष्यात नेहमीच साथ दिली होती.