NEET Paper Leak Case: वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये आता तपास यंत्रणांना मोठे यश आले आहे. या प्रकरणातील दुसरा मुख्य संशयित आरोपी धनंजय लोखंडे याला पोलिसांनी अहिल्यानगर (अहमदनगर) येथून अटक केली आहे. पुण्यातून पळ काढल्यानंतर तो पोलिसांना चकवा देत होता, मात्र तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
पुण्यातून काढला होता पळ; पोलिसांची मोठी कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, पेपरफुटीचे धागेदोरे पुण्यात सापडल्यानंतर पोलिसांनी यापूर्वी एक मोठी शोधमोहीम राबवली होती. त्यावेळी धनंजय लोखंडे याने पोलिसांची चाहूल लागताच पुण्यातून पळ काढला होता. पोलीस त्याच्या मागावर असतानाच तो अहिल्यानगर परिसरात लपून बसल्याची माहिती समोर आली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणामध्ये झालेली ही दुसरी मोठी अटक असल्याने तपासाला आता नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
आणखी किती आरोपी जाळ्यात येणार?
धनंजय लोखंडेच्या अटकेनंतर आता या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे, हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या पेपरफुटीचे कनेक्शन राज्यातील इतर जिल्ह्यांपर्यंत पोहोचले आहे का? आणि मुख्य सूत्रधार कोण आहे? या दिशेने सध्या चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन जणांना अटक केली असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणी आणखी काही मोठ्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.