Mahaparinirvan Din: मुंबईकरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर रोजीच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबई आणि ठाणे परिसरातील अनेक शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणाऱ्या डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस विशेष म्हणून साजरा केला जात असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले. या दिवशी मुंबई आणि ठाण्यातील सरकारी कार्यालयांत कार्यरत कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार आहे. तथापि, ज्या कर्मचाऱ्यांना सुट्टी लागू होत नाही त्यांच्या बाबतीत एक दिवसाची अर्जित रजा मंजूर करण्यात येणार आहे. महानगरपालिकेने जारी केलेल्या आदेशात अत्यावश्यक सेवांतील कर्मचारी मात्र सुट्टीच्या मर्यादेबाहेर राहतील, असे नमूद केले आहे.
संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश
या वर्षी डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाची 69वी वर्षी आहे. देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी 6 डिसेंबरला मुंबईत दाखल होत असल्याने दादरमधील चैत्यभूमी परिसरात नेहमीप्रमाणेच मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक सुविधा पूर्वीच उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच अनुषंगाने 2 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना स्वच्छता, सुरक्षा, पिण्याचे पाणी, वाहतूक नियंत्रण तसेच मंडप आणि सूचनाफलकांची पुरेशी व्यवस्था करण्याचे आदेश जारी केले. विशेषतः चैत्यभूमी परिसरातील सर्व सेवा सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.
नागरिकांसाठी विशेष लोकल गाड्यांची सोय
महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या प्रवासाचा विचार करून मध्य रेल्वेने 12 विशेष लोकल फेऱ्यांची घोषणा केली आहे. या गाड्या परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल मार्गांवर धावणार असून, या सेवा शुक्रवारच्या रात्रीपासून शनिवारी मध्यरात्रीपर्यंत सुरू राहतील. कुर्ला, ठाणे, कल्याण, परळ, वाशी आणि पनवेल स्थानकांवरून या गाड्या सुटतील.
भारतीय संविधानाचे जनक आणि सामाजिक समतेचे प्रखर पुरस्कर्ते असलेल्या डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या कार्याचा स्मरण करण्यासाठी दरवर्षी 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. वंचित घटकांना न्याय मिळवून देणे, समाजातील सर्व स्तरांमध्ये समानतेची भावना दृढ करणे आणि मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी केलेल्या लढ्याचे स्मरण करण्याच्या उद्देशाने हा दिवस राज्यभरात साजरा केला जातो.