School Gate Collapse: शिक्षण क्षेत्राला सुन्न करणारी एक अत्यंत भीषण आणि वेदनादायी घटना गोंदियात घडली आहे. तिरोडा नगर परिषदेच्या पीएम श्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळेचे लोखंडी प्रवेशद्वार अंगावर कोसळल्याने निराली मनीष चाफले या 11 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. योगायोग म्हणजे ज्या शाळेत ही जीवघेणी घटना घडली, त्याच शाळेत निरालीची आई मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
शाळा सुटली, पण चिमुकली कायमची दुरावली
प्राप्त माहितीनुसार, शनिवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी आनंदाने घराकडे निघत होते. शाळेचे मुख्य गेट वर्षानुवर्षांपासून जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत होते. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, निरालीने गेटला स्पर्श केला आणि अवजड लोखंडी गेट थेट तिच्या अंगावर कोसळले. या भीषण अपघातात निराली गेटखाली दबली गेली. तिला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, परंतु गोंदियाला हलवत असताना वाटेतच तिची प्राणज्योत मालवली.
राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षेत झळकले होते नाव
निराली एक अत्यंत हुशार मुलगी होती. अलीकडेच झालेल्या राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षेत तिने राज्यात चौथा क्रमांक पटकावला होता. तिच्या या यशाबद्दल पुणे येथे तिचा विशेष सत्कारही करण्यात आला होता. एका उज्ज्वल भविष्याची आशा असलेल्या गुणवंत मुलीचा अशा प्रकारे अंत झाल्याने संपूर्ण तिरोडा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! मंत्री भुजबळ थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टर थेट गाड्यांच्या पार्किंगमध्ये लँड, नेमकं काय घडलं?
प्रशासकीय दुर्लक्ष ठरले जीवघेणे?
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेचे हे प्रवेशद्वार जीर्ण झाल्याची कल्पना प्रशासनाला आधीपासूनच होती. त्याबाबतचा दुरुस्ती प्रस्तावही लाल फितीत अडकला होता. केवळ सूचना देऊन विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याचा आरोप आता नागरिकांकडून होत आहे. नगर परिषद प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे एका निष्पाप मुलीचा जीव गेला असून, जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या घटनेमुळे चाफले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.