Saudi Arabia Airstrike : खाडी देशांमधील दोन बलाढ्य राष्ट्र, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यातील संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. एकेकाळी येमेनमध्ये एकत्र लढणाऱ्या या दोन देशांमधील वाद आता टोकाला पोहोचला असून सौदीने केलेल्या एका हवाई हल्ल्याने संपूर्ण अरब जगतात खळबळ उडाली आहे.
हवाई हल्ल्याचे नेमके कारण काय?
सौदी अरेबियाने येमेनमधील मुकल्ला बंदरावर नुकताच भीषण हवाई हल्ला केला. सौदीला असा संशय होता की, युएईने एक जहाज शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याने भरून तिथे पाठवले आहे, जे येमेनमधील बंडखोरांना मदत करण्यासाठी वापरले जाणार होते. युएईच्या या हालचालींमुळे सौदी अरेबियाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचा दावा करत सौदीने हा एअरस्ट्राईक केला. विशेष म्हणजे, सौदीने युएईला सैन्य मागे घेण्यासाठी 24 तासांची मुदत दिली होती, परंतु काही तासांतच हा हल्ला करण्यात आला.
UAE चे प्रत्युत्तर आणि सैन्य माघारी
सौदीच्या या अनपेक्षित कारवाईने युएईने तीव्र संताप व्यक्त केला आहे. युएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, जहाजातील शस्त्रे ही बंडखोरांसाठी नसून स्वतःच्या सैनिकांसाठी पाठवली होती. या वादानंतर युएईने येमेनमधून आपले सैन्य माघारी घेण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. तसेच, दहशतवाद्यांविरुद्धची आपली मोहीम आता शेवटच्या टप्प्यात असून ती लवकरच संपवत असल्याचे युएईने घोषित केले आहे.
येमेनमधील सत्तेचा संघर्ष
येमेनमधील यादवी युद्धात सौदी आणि युएईचे मार्ग वेगळे झाले आहेत:
सौदी अरेबिया : सौदीचे धोरण येमेनमधील अधिकृत सरकारला पाठिंबा देण्याचे आहे. यानुसारच वाटचाल केली जात आहे.
UAE : येमेनच्या दक्षिण भागातील फुटीरतावादी संघटना 'साऊदर्न ट्रान्सिशनल कौन्सिल' (STC) ला मदत करत आहे. येमेनचे नेते रशद-अल-अलिमी यांच्या मते, युएई उघडपणे बंडखोरांना उत्तेजित करत असून यामुळे येमेनची स्थिरता धोक्यात आली आहे.
जागतिक चिंता आणि अमेरिकेची मध्यस्थी
दोन महत्त्वाच्या तेल पुरवठादार देशांमधील या तणावामुळे जागतिक बाजारात चिंतेचे वातावरण आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरी मार्को रुबियो यांनी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आहे. याशिवाय कुवेत, बहरीन आणि कतार यांसारख्या शेजारील देशांनीही या वादावर चिंता व्यक्त केली असून शांततेचे आवाहन केले आहे.