Narsapur Case: पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयात अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या नसरापूर येथील अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणाचा अंतिम निकाल लागला असून आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मागील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपीला त्याच्या कृत्याची जाणीव करून देत, "1 मे रोजी तू जे कृत्य केलेस ते आठव, तुला फाशी हवी की जन्मठेप? तूच सांग," असे स्पष्ट शब्दांत विचारले होते.
बशर अली केसचा कोर्टात उल्लेख; कडेकोट पोलीस बंदोबस्त
न्यायाधीश एस आर साळुंखे यांच्या समोरासमोर आज अंतिम युक्तिवाद करण्यात आला. आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी इतर राज्यांमधील काही महत्त्वपूर्ण न्यायनिवाड्यांचे दाखले दिले. यामध्ये 'बशर अली' खटल्याचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला. अशाच एका गंभीर प्रकरणात पूर्वी काही घटनांचे वाचन करून आरोपीला थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. अखेर न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्याने न्यायालयात तणावपूर्ण वातावरण असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
अपहरण, अत्याचार आणि पोक्सो अंतर्गत दोषी; गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत क्रूर
आरोपीवर पोक्सो (POCSO) कायद्यातील विविध कलमांनुसार दोष सिद्ध झाले आहेत. कोर्टाने त्याचे हे कृत्य अत्यंत अमानुष आणि क्रूर असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी सरकारी वकिलांनी न्यायालयात सर्व पुरावे आणि घटनाक्रम भक्कमपणे मांडत आरोपीला केवळ आणि केवळ फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी केली होती. यासाठी त्यांनी जुन्या न्यायनिवाड्यांचे संदर्भही न्यायालयासमोर सादर केले होते.
काय होते मूळ प्रकरण?
दरम्यान, 1 मे रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या आजीकडे आली असताना, ती एकटी असल्याचा फायदा घेत भीमराव कांबळे याने तिच्यावर पाळत ठेवली. त्यानंतर तिला फूस लावून पळवून नेले आणि तिच्यावर अत्याचार करून तिला संपवलं. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली होती आणि ठिकठिकाणी निदर्शने झाली होती.
हेही वाचा – Pune Nasrapur Crime : मोठी बातमी! 2 महिन्यात चिमुरडीला न्याय मिळाला; नसरापूर प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा
पोलिसांनी 15 दिवसांत सादर केले होते 1200 पानांचे दोषारोपपत्र
तथापि, जनतेचा संताप आणि प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्र फिरवून आरोपीला बेड्या ठोकल्या. केवळ 15 दिवसांच्या आत पोलिसांनी न्यायालयामध्ये तब्बल 1200 पानांचे विस्तृत दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले होते. या तपासात पोलिसांनी पीडितेचे कुटुंबीय, प्रत्यक्षदर्शी, पंच आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या अहवालासह घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे गोळा केले होते. या संपूर्ण खटल्यात 50 पेक्षा जास्त साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या, तसेच सीसीटीव्ही (CCTV) फुटेजचाही मुख्य पुरावा म्हणून वापर करण्यात आला.