Ruturaj Gaikwad Record: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड याने क्रिकेटच्या जगात एक नवा इतिहास रचला आहे. लिस्ट-ए (List-A) क्रिकेटमध्ये जगातील कोणत्याही फलंदाजाला आजवर जमले नाही, अशी असाधारण कामगिरी त्याने करून दाखवली आहे. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज मायकेल बेवन यांचा तब्बल 22 वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडीत काढत ऋतुराज आता लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक फलंदाजीची सरासरी राखणारा जगातील अव्वल खेळाडू ठरला आहे.
131 चेंडूत 134 धावांची झंझावाती खेळी
सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ऋतुराजने गोव्याविरुद्ध पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 131 चेंडूत 134 धावांची झंझावाती खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 6 षटकार ठोकले. या धमाकेदार कामगिरीनंतर ऋतुराजची लिस्ट-ए क्रिकेटमधील सरासरी आता 58.83 वर पोहोचली आहे. त्याने हा पराक्रम अवघ्या 95 सामन्यांमध्ये करून दाखवला. यापूर्वी हा विक्रम मायकेल बेवन यांच्या नावावर होता, ज्यांनी 427 सामन्यांत 57.86 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. बेवन यांनी 2004 मध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, त्यानंतर इतकी वर्षे हा विक्रम अबाधित होता.
हेही वाचा – T20 World Cup आधी टीम इंडियाला मोठा धक्का; नाश्ता केला अन् अचानक…; राजकोटमध्ये नेमकं काय घडलं?
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा सॅम हेन (57.76 सरासरी) आहे. ऋतुराजने नुकतेच भारतासाठी खेळतानाही शानदार शतक झळकावले होते. मात्र, इतकी सातत्यपूर्ण आणि विक्रमी कामगिरी करूनही न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. वारंवार दुर्लक्षित होऊनही ऋतुराज आपल्या बॅटने चोख प्रत्युत्तर देत असून, निवड समिती आता त्याची दखल कधी घेणार, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.