Rohini Acharya Quits Politics: बिहार निवडणुकीतील पराभवानंतर लालू यादवांच्या कुटुंबात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी अचानक पक्ष आणि कुटुंबाशी संबंध तोडण्याची घोषणा केली असून या निर्णयामुळे राजदच्या गोटात खळबळ उडाली आहे. रोहिणी यांनी सोशल मीडिया ‘X’ वर लिहिले, “मी राजकारण सोडत आहे. मी कुटुंबाशीही नाते तोडत आहे. संजय यादव आणि रमीज यांनी मला हे करण्यास सांगितले. मी सर्व दोष स्वतःवर घेत आहे.” या संदेशानंतर राजद कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला असून कुटुंबातील इतर सदस्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
संजय यादव आणि रमीज कोण?
रोहिणींनी उल्लेख केलेले दोन्ही नेते तेजस्वी यादव यांचे सर्वात जवळचे आणि प्रभावशाली सल्लागार मानले जातात. संजय यादव हे राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि तेजस्वी यादव यांचे जवळचे सल्लागार आहेत. ते बिहारचे राज्यसभा खासदार देखील आहेत. रोहिणी आचार्य यांनी रमीजचे नावही घेतले आहे. रमीज सुलतान हे तेजस्वी यादव यांचे जवळचे सहकारी आणि सल्लागार आहेत. संजय यादव यांच्याप्रमाणेच तेजस्वी यांच्या अंतर्गत वर्तुळाचा भाग मानले जातात. ते तेजस्वी यादव यांच्या वैयक्तिक सचिवालयात (PSD) काम करतात आणि पक्षाच्या रणनीती, मुस्लिम मतपेढी व्यवस्थापन आणि निवडणूक प्रचारात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
पक्षाच्या पराभवासाठी रोहिणींनाच जबाबदार ठरवले?
सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणुकीतील खराब कामगिरीसाठी रोहिणी आचार्यांना लक्ष्य केले गेले. कौटुंबिक वाद सार्वजनिक झाल्याने पक्षाची प्रतिमा बिघडल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे समजते. वादानंतर रोहिणी सिंगापूरला गेल्या होत्या. त्या वेळी त्यांना तातडीने प्रचारासाठी बोलावले गेले. मात्र त्यांना फक्त राघोपूरमध्येच प्रचाराची परवानगी देण्यात आली. छपरा येथील मतदारसंघांमध्ये जाण्यास रोहिणींना नकार दिला गेला, त्यामुळे नाराजी वाढली.
I’m quitting politics and I’m disowning my family …
This is what Sanjay Yadav and Rameez had asked me to do …nd I’m taking all the blame’s — Rohini Acharya (@RohiniAcharya2) November 15, 2025
तेजस्वींचा प्रतिसाद न मिळाल्याने रोहिणी संतप्त
मतमोजणीच्या दिवशी रोहिणींनी तेजस्वींना शुभेच्छा दिल्या, पण तेजस्वींनी त्याकडे दुर्लक्ष केले. संजय यादव यांचा रोहिणींशी आधीपासूनच ताणलेला संबंध असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ते रोहिणींना तेजस्वीसाठी ‘धोका’ मानत असल्याचेही बोलले जाते.