Rickshaw Driver Migration: रिक्षा, टॅक्सी चालकांचे धाबे दणाणले! मराठी अनिवार्यतेच्या निर्णयामुळे परप्रांतीय चालकांचे स्थलांतर; रिक्षानेच सुरू केला हजारो किमीचा प्रवास

मराठी भाषेची सक्ती आणि संभाव्य कारवाई टाळण्यासाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शेकडो रिक्षा चालकांनी आपल्या कुटुंबासह परतीची वाट धरली आहे.

Rickshaw Driver Migration: रिक्षा, टॅक्सी चालकांचे धाबे दणाणले! मराठी अनिवार्यतेच्या निर्णयामुळे परप्रांतीय चालकांचे स्थलांतर; रिक्षानेच सुरू केला हजारो किमीचा प्रवास

Rickshaw Driver Migration:  महाराष्ट्र सरकारने 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विरोध करत अनेक रिक्षा चालक संपावर जाण्याच्या तयारीत असतानाच, दुसरीकडे मुंबई आणि परिसरातील परप्रांतीय चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मराठी भाषेची सक्ती आणि संभाव्य कारवाई टाळण्यासाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शेकडो रिक्षा चालकांनी आपल्या कुटुंबासह परतीची वाट धरली आहे. विशेष म्हणजे, हे चालक रेल्वेऐवजी स्वतःच्या रिक्षानेच हजारो किलोमीटरचा प्रवास करत मूळ गावी निघाल्याचे चित्र समोर आले आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर रिक्षांच्या रांगा
सध्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दररोज शेकडो रिक्षा उत्तर प्रदेश आणि बिहारच्या दिशेने जाताना दिसत आहेत. हे चालक केवळ स्वतः जात नसून, आपल्या कुटुंबासह आणि घरातील सर्व संसारोपयोगी सामानासह मार्गस्थ झाले आहेत. प्रवासात खाण्यासाठी सोबत बेकरीचे पदार्थ, सुका खाऊ आणि पिण्याचे पाणी घेऊन हे चालक आपले घर गाठण्यासाठी निघाले आहेत. हजारो किलोमीटरचा हा प्रवास अत्यंत कठीण असला, तरी रोजगारावर संकट आल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे.

“भाषा शिकायला वेळ हवा”; चालकांची आर्त हाक
या स्थलांतराबाबत एका रिक्षा चालकाने आपली व्यथा मांडताना सांगितले की, “आम्हाला मराठी भाषा येत नाही आणि सरकारने ती अचानक अनिवार्य केली आहे. कोणतीही नवीन भाषा शिकण्यासाठी वेळ लागतो, मात्र सरकार आम्हाला तो वेळ द्यायला तयार नाही. विनाकारण होणारी कारवाई आणि रोजगाराची अनिश्चितता यामुळे आम्ही आमच्या राज्यात परत जाण्याचा निर्णय घेतला आहे.” सरकारकडून कोणतीही सवलत मिळत नसल्याने आपल्या हक्काच्या राज्यात जाऊन दुसरा व्यवसाय करणे योग्य असल्याचे या चालकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – Mamledar Misal Thane: ठाण्याचा खाद्य वारसा ढासळला! ‘मामलेदार मिसळ’ची ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त

राजकीय आणि सामाजिक पडसाद
दरम्यान, 1 मे या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लागू होणाऱ्या या नियमामुळे रिक्षा-टॅक्सी व्यवसायात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक संघटना मराठी भाषेच्या निर्णयाचे स्वागत करत असताना, परप्रांतीय कामगारांचे हे मोठ्या प्रमाणावरील स्थलांतर चर्चेचा विषय ठरत आहे. यामुळे आगामी काळात मुंबईसारख्या शहरांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number