Thane Water Cut : उन्हाळ्याच्या कडाक्यात ठाण्यातील काही महत्त्वाच्या भागांतील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात तातडीची दुरुस्ती आणि जलवाहिन्यांच्या कामासाठी गुरुवारी मुंब्रा, कळवा आणि दिवा परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे. यामुळे दाट लोकवस्तीच्या या भागांना 24 तासांच्या पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.
पाणीकपातीचे वेळापत्रक काय?
सुरुवात: गुरुवार (23 एप्रिल), दुपारी 12:00 वाजेपासून.
समाप्ती: शुक्रवार (24 एप्रिल), दुपारी 12:00 वाजेपर्यंत.
उन्हामुळे पाण्याची मागणी वाढलेली असतानाच हा शटडाऊन आल्याने नागरिकांना विशेषतः गृहिणींना पाण्याचे नियोजन करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.
या भागांना बसणार सर्वाधिक फटका:
या दुरुस्तीच्या कामामुळे खालील प्रभाग समित्यांच्या क्षेत्रातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असेल:
मुंब्रा प्रभाग समिती: प्रभाग क्र. 26 आणि 31 चा काही भाग वगळता संपूर्ण प्रभाग.
कळवा प्रभाग समिती: कळव्यातील सर्व भाग.
दिवा प्रभाग समिती: दिव्याचा संपूर्ण परिसर.
इतर भाग: वागळे प्रभाग समितीमधील कोलशेत खालचा गाव आणि माजिवडा-मानपाडा परिसरातील काही भाग.
पुढील दोन दिवस कमी दाबाने पुरवठा
शुक्रवारी दुपारी 12:00 वाजल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल. मात्र, जलवाहिन्यांमधील हवेच्या दाबामुळे सुरुवातीला पाणी कमी दाबाने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवारीही काही भागांत पाण्याची टंचाई भासू शकते.
पाणीपुरवठा विभागाचे नागरिकांना आवाहन
ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. "नागरिकांनी आजच पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि शटडाऊनच्या काळात उपलब्ध पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा," असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी साठवणूक करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.