Republic Day Parade 2026 : भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण असून, 26 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या भव्य परेडचे तिकीट मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. सोमवारी तिकीट विक्री सुरू होताच अवघ्या काही तासांतच हजारो तिकिटांची विक्री झाली. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिन परेडच्या तिकिटांचा दिवसाचा 2,225 तिकिटांचा कोटा काही तासांतच संपला, तर 'बीटिंग रिट्रीट' सोहळ्यासाठीही पहिल्याच दिवशी 692 तिकिटे विकली गेली.
तिकिटांचे दर आणि उपलब्धता
परेड आणि बीटिंग रिट्रीट सोहळ्यासाठी तिकिटांचे दर अतिशय माफक ठेवण्यात आले आहेत. प्रजासत्ताक दिन परेडसाठी 20 रुपये आणि 100 रुपये अशा दोन श्रेणीतील तिकिटे उपलब्ध आहेत. तसेच, 28 जानेवारी रोजी होणाऱ्या 'बीटिंग रिट्रीट' फुल ड्रेस रिहर्सलसाठी 20 रुपये आणि 29 जानेवारीच्या मुख्य सोहळ्यासाठी 100 रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आला आहे. ही सर्व तिकिटे 14 जानेवारीपर्यंत अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध राहतील.
ऑनलाइन तिकीट कसे खरेदी करावे? (Step-by-Step)
जर तुम्हाला घरबसल्या तिकीट बुक करायचे असेल, तर खालील स्टेप्स फॉलो करा:
1. प्रथम 'आमंत्रण'च्या अधिकृत वेबसाइटवर (www.aamantran.mod.gov.in) जा.
2. तुमचे नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा.
3. लॉगिन झाल्यावर आवश्यक माहिती भरा किंवा जलद पडताळणीसाठी आधार कार्डचा वापर करा.
4. तुम्हाला जो सोहळा पाहायचा आहे (परेड किंवा बीटिंग रिट्रीट) तो निवडा आणि ऑनलाइन पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा.
5. जर तुमच्यासोबत कुटुंब किंवा मित्र असतील, तर त्यांना 'गेस्ट लिस्ट'मध्ये जोडून त्यांचेही तिकीट एकाच वेळी बुक करता येईल.
ऑफलाइन तिकीट मिळवण्यासाठी 6 ठिकाणे
ज्यांना ऑनलाइन तिकीट जमणार नाही, त्यांच्यासाठी दिल्लीत 6 ठिकाणी विशेष काउंटर सुरू करण्यात आले आहेत. सकाळी 10:00 ते दुपारी 1:00 आणि दुपारी 2:00 ते संध्याकाळी 5:00 या वेळेत खालील ठिकाणी तिकिटे मिळतील:
सेना भवन (गेट नंबर 5)
शास्त्री भवन (गेट नंबर 3)
जंतर मंतर (मुख्य गेट)
संसद भवन (रिसेप्शन काउंटर)
राजीव चौक मेट्रो स्टेशन (गेट नंबर 3 व 4)
काश्मिरी गेट मेट्रो स्टेशन (गेट नंबर 8)
महत्त्वाची सूचना: तिकीट खरेदी करताना आणि सोहळ्याला जाताना आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड यांसारखे मूळ सरकारी ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
हेही वाचा – World's Largest Shivling : बिहारमध्ये जगातील सर्वात मोठं शिवलिंग; 33 फूट उंची अन् 210 टन वजनाचे भव्य रूप