Watermelon Death: उन्हाच्या तडाख्यापासून आराम मिळवण्यासाठी आणि पोटातील जळजळ शांत करण्यासाठी फळ खाणे एका कुटुंबाच्या जीवावर बेतले आहे. मुंबईतील पायधुनी येथील घटनेची पुनरावृत्ती मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये घडली असून, कलिंगड खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडून एका 43 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांचा तरुण मुलगा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.
नेमकी घटना काय?
प्राप्त माहितीनुसार, इंद्रसिंग परमार (वय 43) आणि त्यांचा मुलगा विनोद (21) यांना गुरुवारी रात्रीपासून छातीत जळजळ होण्याचा त्रास होत होता. शुक्रवारी सकाळी हा त्रास वाढल्याने पोटात थंडावा मिळेल या विचाराने त्यांनी बाजारातून कलिंगड आणून खाल्ले. मात्र, हे कलिंगड खाणे त्यांच्यासाठी जीवघेणे ठरले.
उपचारापूर्वीच वडिलांचा अंत
कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळातच दोघांनाही तीव्र अस्वस्थता जाणवू लागली आणि उलट्या सुरू झाल्या. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथून पुढील उपचारासाठी राजस्थानमधील कोटा येथे नेत असताना वाटेतच इंद्रसिंग यांची प्राणज्योत मालवली. मुलगा विनोद याची प्रकृती अद्याप गंभीर असून त्याच्यावर कोटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डॉक्टरांचा संशय: केवळ कलिंगड की अन्नबाधा?
या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण असून वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. डॉक्टरांनी केवळ कलिंगड खाल्ल्याने मृत्यू झाल्याची शक्यता प्राथमिक स्तरावर फेटाळली आहे. हा प्रकार गंभीर 'फूड पॉयझनिंग' किंवा शरीरातील एखाद्या घातक संसर्गामुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.