Nanded Vishnupuri Dam : नांदेडकरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार आणि सातत्यपूर्ण पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. यामुळे अनेक दिवसांपासून जाणवत असलेल्या पाणीटंचाईच्या संकटाला मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील प्रमुख विष्णुपुरी धरणात केवळ 24 तासांमध्ये 9 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा वाढला असून, या वाढीचा लाभ शहराच्या पाणीपुरवठ्यासोबतच ग्रामीण भागातील शेती आणि सिंचन व्यवस्थेलाही होणार आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, विष्णुपुरीप्रमाणेच अपर मानार आणि लोअर मानार प्रकल्पांमध्येही पाण्याची आवक वेगाने सुरू आहे.
विष्णुपुरीसह इतर धरणांमध्येही पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ
दरम्यान, 30 जुलै रोजी विष्णुपुरी धरणातील पाणीसाठा 27.01 दलघमी इतका होता. मात्र अवघ्या एका दिवसात तो वाढून 31 जुलै रोजी 34.150 दलघमीवर पोहोचला. त्यामुळे धरणाची साठवण क्षमता 33.42 टक्क्यांवरून थेट 42.27 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
तथापी, अपर मानार प्रकल्पातही पावसाचा मोठा परिणाम दिसून आला असून, येथे पाणीसाठा 16.00 दलघमी वरून 23.130 दलघमी झाला आहे. परिणामी धरणाची पाणीपातळी 21.39 टक्क्यांवरून 30.55 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. त्याचप्रमाणे लोअर मानार धरणातील साठाही 59.809 दलघमी वरून 67.360 दलघमीपर्यंत पोहोचला असून, धरणाची भराव क्षमता 43.33 टक्क्यांवरून 48.74 टक्के झाली आहे.
हेही वाचा – Rain Update: ऑगस्ट महिन्यात पाऊस उघडीप देणार? हवामान विभागाचा 31 जुलै ते 27 ऑगस्टसाठी पावसाचा अंदाज
पिण्याच्या पाण्याची चिंता कमी; खरीप हंगामालाही मोठा आधार
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, नाले आणि ओढे पुन्हा प्रवाही झाले आहेत. धरणांमधील वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे नांदेड शहरासह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, खरीप हंगामात पावसाअभावी अडचणीत आलेल्या पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली असून, अशीच परिस्थिती राहिल्यास जिल्ह्यातील प्रमुख धरणे लवकरच अधिक क्षमतेने भरतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.