Thane Rain Red Alert: हवामान विभागाने 4 जुलै 2026 रोजी ठाणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा 'रेड अलर्ट' जाहीर केल्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने तातडीने खबरदारीची पावले उचलली आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत केडीएमसीच्या शिक्षण विभागाने शनिवार, 4 जुलै रोजी महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सरकारी व खासगी संस्थांसह सर्व शिक्षण मंडळांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये बंधनकारक असणार आहे.
प्राथमिक ते महाविद्यालयांपर्यंत सर्वच शैक्षणिक संस्था बंद
महापालिकेच्या आदेशानुसार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांसह सर्व महाविद्यालये बंद राहतील. State Board, CBSE, ICSE आणि CIE या सर्व शिक्षण मंडळांशी संलग्न असलेल्या शासकीय तसेच खासगी शैक्षणिक संस्थांनाही हा आदेश लागू राहणार आहे. संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
संपूर्ण वीकेंडभर मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 1 ते 3 जुलै या कालावधीत परिसरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यानंतर 4 जुलैरोजी परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 5 जुलै रोजी पुन्हा ऑरेंज अलर्ट लागू राहणार आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचणे, पूरसदृश स्थिती निर्माण होणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर शाळा प्रशासनालाही आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महापालिका प्रशासन सतर्क; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी केडीएमसी प्रशासनानेही सज्जता वाढवली आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी जारी केलेल्या विशेष परिपत्रकानुसार शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवसांसाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयात किंवा मुख्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले असून, वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणालाही मुख्यालय किंवा शहर सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा – Ambenali Ghat : पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
पूर्वीच्या पावसाचा अनुभव लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक तयारी
यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कल्याण-डोंबिवलीतील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. या समस्यांवरून महापालिकेवर टीकेची झोडही उठली होती. त्यामुळे यावेळी संभाव्य अतिवृष्टीपूर्वीच प्रशासनाने खबरदारीची भूमिका स्वीकारली आहे. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनीही हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.