Real Estate Trends 2025 : भारतीय गृहनिर्माण बाजारपेठेसाठी 2025 हे वर्ष आव्हानात्मक ठरले आहे. वाढत्या किमती आणि आयटी क्षेत्रातील टाळेबंदीमुळे (Layoffs) खरेदीदारांनी घरांपासून दूर राहणे पसंत केले आहे. 2024 मध्ये 4,59,645 युनिट्सची विक्री झाली होती, जी 2025 मध्ये घसरून 3,95,625 युनिट्सवर आली आहे.
घसरणीची प्रमुख कारणे
अॅनारॉकचे अध्यक्ष अनुज पुरी यांच्या मते, जागतिक भू-राजकीय तणाव, आर्थिक अनिश्चितता आणि विशेषतः आयटी क्षेत्रातील नोकरकपातीमुळे मागणीवर मोठा दबाव आला. घरांच्या किमती मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेल्याने विक्रीच्या वेगाला खीळ बसली आहे.
विक्री मूल्य वाढले
विशेष म्हणजे, विक्री झालेल्या घरांची संख्या कमी झाली असली तरी, एकूण व्यवहारांचे मूल्य मात्र वाढले आहे. 2024 मध्ये हे मूल्य 5.68 लाख कोटी होते, जे 2025५ मध्ये 6 टक्क्यांनी वाढून 6 लाख कोटी रुपये झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे घरांच्या सरासरी किमतीत झालेली 8 टक्क्यांची वाढ. सरासरी दर आता 9,260 रुपये प्रति चौरस फुटांवर पोहोचला आहे.
शहरनिहाय कामगिरी
2025 मधील घरांच्या विक्रीचा विचार करता, हैदराबादच्या गृहनिर्माण बाजारपेठेत सर्वात मोठी म्हणजे 23 टक्के घट पाहायला मिळाली, जिथे केवळ 44,885 युनिट्सची विक्री झाली. पुणे शहराचेही गणित बिघडलेले दिसले, तिथे विक्रीत 20 टक्क्यांची लक्षणीय घट होऊन आकडा 65,135 युनिट्सवर स्थिरावला. देशातील सर्वाधिक विक्रीचे केंद्र असणाऱ्या मुंबई महानगर प्रदेशात (MMR) विक्रीचे प्रमाण सर्वाधिक असले तरी, गेल्या वर्षाच्या तुलनेत तिथे 18 टक्क्यांची मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. दुसरीकडे, कोलकाता आणि दिल्ली-एनसीआर मध्ये अनुक्रमे 12 टक्के आणि 8 टक्के ची घट झाली असून तिथे मध्यम परिणाम दिसून आला. आयटी क्षेत्रातील संकटामुळे बेंगळुरूमध्येही विक्री 5 टक्क्यांनी घटली आहे. मात्र, या सर्व शहरांच्या विपरीत कामगिरी करत चेन्नईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सात प्रमुख शहरांपैकी केवळ चेन्नईमध्येच विक्रीत 15 टक्क्यांची सकारात्मक वाढ झाली असून, गृहविक्री वाढलेले हे देशातील एकमेव प्रमुख शहर ठरले आहे.
दरम्यान, 2026 मध्ये गृहनिर्माण क्षेत्राचे भवितव्य प्रामुख्याने रिझर्व्ह बँकेच्या (RBI) निर्णयांवर अवलंबून असेल. जर गृहकर्जाच्या व्याजदरात कपात झाली आणि विकासकांनी घरांच्या किमती नियंत्रणात ठेवल्या, तर पुन्हा एकदा घरांची मागणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.