Ratnagiri Mango Merchant suicide : रत्नागिरी जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना सोमवारी समोर आली आहे. तालुक्यातील ताणदे येथील नामांकित आंबा बागायतदार आणि यशस्वी उद्योजक रुपेश नागवेकर यांनी स्वतःच्या बंदुकीतून गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. सोमवारी राहत्या घरी ही घटना घडली असून, गोळीबाराचा आवाज ऐकताच कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी त्यांच्या खोलीकडे धाव घेतली. तिथे रुपेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने वाचवण्याचे प्रयत्न करत रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आजारपण आणि आर्थिक तणावातून उचलले टोकाचे पाऊल?
रुपेश नागवेकर यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, प्राथमिक माहितीनुसार ते गेल्या काही काळापासून गंभीर आजारपणाशी झुंज देत होते. केवळ शारीरिक व्याधीच नव्हे, तर व्यवसायातील वाढती आर्थिक विवंचना आणि इतर व्यापाऱ्यांची देणी यामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. या विवंचनेतून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग न दिसल्याने त्यांनी स्वतःचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
उद्योजक रुपेश नागवेकर यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे संपूर्ण कोकणातील आंबा बागायतदार क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने त्यांच्या पश्चात असलेल्या कुटुंबियांवर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा – Mango Pulp Scam: आवडीने आमरस खाताय? तब्बल 32 हजार किलो भेसळयुक्त आमरसाचा साठा जप्त, FDA ची मोठी कारवाई
पोलीस तपास आणि परवानाधारक शस्त्राचा प्रश्न
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण घराचा पंचनामा केला असून ज्या शस्त्राने गोळी झाडण्यात आली, त्याचा तपास सुरू केला आहे. प्रामुख्याने, ती बंदूक परवानाधारक होती का आणि ती घरात कोठे ठेवली होती, या बाबी पोलीस तपासात महत्त्वाच्या ठरणार आहेत. तसेच घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट (आत्महत्या पूर्व चिठ्ठी) सापडली आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या ग्रामीण पोलिसांकडून केला जात आहे.
हेही वाचा – Nashik Crime: आधी 2 लाख घ्यायचे, लग्न लावायचं आणि दुसऱ्या दिवशी नवरी फरार; नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार