Ranjit Patil Death: मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एक उमदा चेहरा, अभिनेता आणि दिग्दर्शक रणजित पाटील यांचे वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक जाण्याने मराठी सिनेसृष्टीसह नाट्यवर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून कलाकार आणि चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली
मिळालेल्या माहितीनुसार, रणजित यांना घरी असतानाच अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि मोठा आप्तपरिवार आहे. रणजित यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी म्हणजेच कोल्हापूर येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
हेही वाचा – Suraj Chavan House : सुरज चव्हाणच्या घरावरील नेमप्लेट चर्चेत! घरावर झळकणारं 'ते' नाव नेमकं कोणाचं?
रंगभूमीशी नातं आणि 'जर तरची गोष्ट'चे यश
रणजित पाटील यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही आपला स्वतंत्र ठसा उमटवला होता. अलीकडच्या काळात अत्यंत गाजलेल्या उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या 'जर तरची गोष्ट' या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनीच केले होते. या नाटकाच्या प्रचंड यशामागे रणजित यांची कल्पकता आणि मेहनत कारणीभूत होती. रंगभूमीवर काम करताना त्यांनी अनेक नव्या दमाच्या कलाकारांना मार्गदर्शन केले आणि त्यांना व्यासपीठ मिळवून दिले.
अभिनयातील योगदान
दिग्दर्शनासोबतच रणजित यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांतून अभिनयाची चुणूक दाखवली होती. लोकप्रिय वेबसीरीज 'काळे धंदे' मधील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. आपल्या प्रत्येक कामात संयम आणि अभ्यासू वृत्ती जपण्यासाठी ते ओळखले जात. रणजित यांच्या निधनाचे वृत्त समजताच स्वप्नील जोशी, उमेश कामत यांसह अनेक मराठी कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.