Hadpsar Railway Station: मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील महत्त्वाचे उपकेंद्र असलेल्या हडपसर रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. मुख्य पुणे स्टेशनवरील प्रवाशांची वाढती गर्दी विभागण्यासाठी रेल्वे बोर्डाने हडपसर स्थानकावर चौथ्या प्लॅटफॉर्मच्या (फलाट) उभारणीला अधिकृत मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पूर्व पुण्यातील लाखो रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, हडपसर स्थानक आता पुण्याचे महत्त्वाचे 'सॅटेलाइट टर्मिनल' म्हणून उदयास येणार आहे.
प्रवाशांसाठी ठरणार 'गेम चेंजर'
सध्या हडपसर स्थानकातून दररोज सुमारे 4,000 प्रवासी ये-जा करतात. नवीन फलाट कार्यान्वित झाल्यानंतर या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. याचा सर्वाधिक फायदा मगरपट्टा सिटी, खराडी आणि वाघोलीतील आयटी कर्मचाऱ्यांना तसेच हडपसर, मांजरी आणि सासवड रोड परिसरातील रहिवाशांना होईल. अतिरिक्त फलाटामुळे या स्थानकावरून दररोज किमान 3 ते 4 नवीन गाड्या सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होणार असल्याने, लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी प्रवाशांना आता मुख्य पुणे स्टेशनला जाण्याची कसरत करावी लागणार नाही.
रेल्वेचा मास्टर प्लॅन आणि निधी
रेल्वे बोर्डाने सध्या 14 डब्यांच्या गाड्यांसाठी (400 मीटर) मंजुरी दिली असली, तरी रेल्वे प्रशासन भविष्यातील गरज ओळखून 24 डब्यांच्या (650 मीटर) गाड्यांसाठी आग्रही आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी साधारण 7 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. तांत्रिक मान्यता मिळताच लवकरच निविदा प्रक्रिया (Tender) राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. यामुळे स्थानकाची कार्यक्षमता वाढून रेल्वे गाड्यांचे थांबे वाढवणे प्रशासनाला सोपे जाईल, असे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांनी स्पष्ट केले आहे.