Mumbai Pune Expressway Traffic : नाताळचा सण आणि त्याला जोडून आलेल्या सलग सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांनी शहराबाहेर धाव घेतल्याने शनिवारी प्रमुख महामार्गांवर वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई-गोवा महामार्गावर हजारो वाहने एकाच वेळी रस्त्यावर उतरल्याने प्रशासकीय नियोजनाचा पुरता बोजवारा उडाला.
एक्स्प्रेस वे वर 2 तासांचा विलंब
मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांना बोरघाटात भीषण कोंडीचा सामना करावा लागला. गुरुवारी सकाळपासूनच वाहनांचा ओघ वाढल्याने घाट परिसरात 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अवघ्या 15-20 मिनिटांचे हे अंतर पार करण्यासाठी प्रवाशांना दीड ते दोन तास मोजावे लागले. संथ वाहतुकीमुळे इंजिन गरम होऊन वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने कोंडीत अधिकच भर पडली.
हेही वाचा – BJP Nashik : भाजपमधील 'इनकमिंग'मुळे निष्ठावंतांमध्ये नाराजी! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर देवयानी फरांदें भावुक
कोकण मार्गावर बेशिस्त चालकांमुळे डोकेदुखी
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील पेण ते वडखळ या पट्ट्यातही भीषण स्थिती होती. काही बेशिस्त चालकांनी लेनची शिस्त मोडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वडखळ ते अलिबाग या मार्गावरही वाहनांची गती मंदावली होती. पोलिसांची संख्या वाढवूनही वाढत्या वाहनांच्या संख्येपुढे वाहतूक नियमन करणे कठीण झाले होते.
हेही वाचा – Meenakshi Shinde : बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचा राजीनामा
अलिबाग परिसरात पर्यटकांची विक्रमी हजेरी
तथापी, रस्त्यांवरील संतापजनक कोंडी असली तरी पर्यटनाचा उत्साह दांडगा होता. अलिबाग, नागाव, किहीम, मुरुड आणि काशिद येथील समुद्रकिनारे पर्यटकांनी ओसंडून वाहत होते. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान चालणाऱ्या बोटींच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या असूनही प्रवाशांची गर्दी ओसरत नव्हती. गेल्या दोन दिवसांत एकट्या अलिबाग परिसरात 20 हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली आहे. तथापी, कोकणातील बहुतांश हॉटेल्स, लॉजेस आणि रिसॉर्ट्सना 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड लागले आहेत.