Pure Milk Identification at Home : आरोग्यासाठी फायदेशीर समजून आपण जे दूध रोज पितो, ते खरंच शुद्ध आहे का? सध्या बाजारात नफा कमवण्याच्या हव्यासापोटी अन्नपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जात आहे. अन्न सुरक्षा विभागाने नुकताच हजारो लीटर नकली दूध बनवणारा साठा जप्त केला असून, कमी खर्चात तयार होणारे हे भेसळयुक्त दूध अस्सल दरात विकले जात असल्याचे समोर आले आहे. पॅकेटच्या आणि खुल्या दुधाच्या सुरक्षिततेवर यामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही किंवा तुमची मुले नकळत विषारी केमिकल तर पीत नाहीत ना, हे ओळखण्यासाठी घरीच काही सोप्या चाचण्या करणे गरजेचे आहे.
दुधात नेमकी कसली भेसळ केली जाते?
नफा वाढवण्यासाठी दुधामध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींची भेसळ केली जाते:
– पाणी आणि स्टार्च: दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी त्यात पाणी ओतले जाते आणि ते पुन्हा दाटसर दिसावं म्हणून स्टार्च (पिष्टमय पदार्थ) मिसळतात.
– डिटर्जंट आणि यूरिया: दुधाला पांढराशुभ्र रंग आणि फेस आणण्यासाठी कपडे धुवायचे डिटर्जंट किंवा यूरियासारखे घातक केमिकल त्यात विरघळवले जातात, जे शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहेत.
घरच्या घरी शुद्धतेची तपासणी करण्याचे सोपे उपाय
तुम्ही विकत घेतलेले दूध सुरक्षित आहे की नाही, हे तपासण्यासाठी खालील पद्धतींचा वापर करा:
1. लाकूड किंवा काचेची चाचणी (पाण्याची भेसळ ओळखणे)
लाकडाच्या गुळगुळीत तुकड्यावर किंवा काचेच्या उभ्या पट्टीवर दुधाचा एक थेंब टाका. जर तो थेंब हळूहळू खाली वाहत गेला आणि मागे पांढरी रेघ सोडून गेला, तर समजावे दूध शुद्ध आहे. जर थेंब वेगाने घसरला आणि मागे काहीही राहिले नाही, तर दुधात पाणी मिसळलेले आहे, असे समजावे.
2. ग्लास टेस्ट (डिटर्जंटची भेसळ ओळखणे)
एका काचेच्या छोट्या ग्लासामध्ये 5 ml दूध आणि तितकेच म्हणजे 5 ml पाणी एकत्र करा. हे मिश्रण हाताने जोरात हलवून घ्या. जर त्यावर अगदी कमी फेस आला आणि तो लगेच नाहीसा झाला, तर दूध शुद्ध आहे. याउलट, जर खूप जास्त फेस तयार झाला आणि तो तसाच राहिला, तर दुधात डिटर्जंट असण्याची शक्यता असते.
3. मिठाची टेस्ट (स्टार्चची भेसळ ओळखणे)
एका काचेच्या भांड्यात किंवा ग्लासमध्ये 5 ml दूध घ्या. त्यामध्ये 2 ते 3 थेंब आयोडीनयुक्त मीठ (किंवा आयोडीन लिक्विड) टाका. जर रासायनिक प्रक्रियेमुळे दुधाचा रंग बदलून निळा झाला, तर दुधात स्टार्चची भेसळ झालेली आहे.
4. डाळीच्या पिठाची चाचणी (युरियाची भेसळ ओळखणे)
दुधात युरिया आहे की नाही हे पाहण्यासाठी, दुधात थोडी तुरीच्या डाळी पावडर मिक्स करा आणि 5 मिनिटे हलवा. त्यानंतर त्यात लाल रंगाचा लिटमस पेपर बुडवून बाहेर काढा. जर या लाल लिटमस पेपरचा रंग बदलून निळा झाला, तर ते दूध नकली आणि आरोग्यासाठी घातक आहे.
हेही वाचा – तुम्हीही AC लावून झोपता का? AC मध्ये झोपणाऱ्यांना वाटतं आजारी असल्यासारखं; खरं आहे का?, जाणून घ्या सत्य