Sachin Ghaywal Arrested: पुणे पोलिसांची मोठी कारवाई! कुख्यात गँगस्टर सचिन घायवळ राजस्थानमधून अटकेत

गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देत असलेल्या सचिन घायवळला राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले.

Sachin Ghaywal Arrested: पुणे पोलिसांची मोठी कारवाई! कुख्यात गँगस्टर सचिन घायवळ राजस्थानमधून अटकेत

Sachin Ghaywal Arrested: पुण्यातील गुन्हेगारी विश्वात खळबळ उडवणाऱ्या कारवाईत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कुख्यात गुंड सचिन घायवळ याला अटक केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देत असलेल्या सचिन घायवळला राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले. कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर घायवळ टोळी पोलिसांच्या रडारवर आली होती. टोळीचा प्रमुख निलेश घायवळ देशाबाहेर फरार झाल्यानंतर त्याचा सख्खा भाऊ सचिन घायवळच संपूर्ण टोळीची सूत्रे हाताळत असल्याची माहिती तपासात समोर आली होती.

फ्लॅट बळकावणे, खंडणी आणि गंभीर गुन्ह्यांचे आरोप

सचिन घायवळवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्या विरोधात खंडणी, धमकी, बेकायदेशीर मालमत्ता ताब्यात घेणे आणि शस्त्र बाळगण्याचे आरोप आहेत. कोथरूड परिसरातील नव्याने उभारण्यात आलेल्या एका इमारतीतील तब्बल 10 फ्लॅट्स जबरदस्तीने स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. याशिवाय कर्वेनगर आणि शिवणे परिसरातील एका खाजगी कंपनीच्या महिला संचालकाला धमकावून खंडणी उकळल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, आर्म्स अॅक्टचे उल्लंघन आणि खुनाचा प्रयत्न यांसारख्या गुन्ह्यांमुळे तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील मोस्ट वॉन्टेड आरोपींपैकी एक बनला होता.

अनेक जिल्ह्यांत शोधमोहीम; पोलिसांना वारंवार चकवा

सचिन घायवळचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी पुणे, अहिल्यानगर आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली होती. काही दिवसांपूर्वी तो जामखेड परिसरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचला होता. मात्र स्थानिक स्तरावर मिळालेल्या मदतीमुळे सचिन घायवळ पोलिसांना चकवा देत पसार झाला होता. त्यानंतर तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा माग काढत राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात यश मिळवले.

टोळीचा प्रमुख निलेश घायवळ अद्याप फरार

दरम्यान, घायवळ टोळीचा प्रमुख आणि सचिनचा भाऊ निलेश घायवळ अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो लंडनला फरार झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्याच्या विरोधात कारवाई करत पुणे पोलिसांनी त्याचा पासपोर्ट आणि व्हिसा रद्द केला आहे. नियमांनुसार पासपोर्ट रद्द झाल्यानंतर भारतात परतणे अपेक्षित असले तरी निलेश अद्याप परदेशातच असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा – Crime News: 14 वर्षांची मुलगी वेदनेने कळवळत होती, निर्दयी डॉक्टरने केलं अमानुष कृत्य, 25 हजार न दिल्याच्या रागात…

प्रत्यार्पणासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू

निलेश घायवळ सध्या लंडनमध्येच आहे की दुसऱ्या देशात आश्रय घेतला आहे, याचा तपास सुरू आहे. आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रक्रियेनुसार त्याला भारतात परत आणण्यासाठी पुणे पोलीस विविध यंत्रणांच्या मदतीने प्रयत्न करत आहेत. सचिन घायवळच्या अटकेनंतर आता तपास यंत्रणांचे लक्ष निलेश घायवळच्या प्रत्यार्पणाकडे लागले असून, या कारवाईमुळे पुण्यातील संघटित गुन्हेगारीविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number