Pune Study Centers: पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. शहरात वेगाने वाढलेल्या अभ्यासिका आणि पेइंग गेस्ट होस्टेलपैकी अनेकांकडे परवानग्यांचा अभाव असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पार्किंगची अडचण, विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणी केलेली गर्दी, निकालानंतर होणारा गोंधळ आणि काही ठिकाणी शिस्तभंगाच्या तक्रारी यामुळे रहिवाशांचा त्रास वाढत चालल्याचं चित्र समोर आलं आहे. पुण्यात देशविदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. तथापी, स्पर्धापरीक्षांची तयारी करण्यासाठीही ग्रामीण भागातून असंख्य विद्यार्थी शहरात वास्तव्यास येतात. त्यामुळे अभ्यासिकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र त्यातील मोठा हिस्सा अनधिकृत असल्याचे समोर आले आहे.
नागरिकांच्या तक्रारींचा आढावा
या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच बैठक घेण्यात आली. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर, परिमंडळ पाचचे उपायुक्त निखिल मोरे, क्षेत्रीय सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड, मुख्य सुरक्षा अधिकारी डॉ. रमेश शेलार आणि संबंधित लोकप्रतिनिधी यात सहभागी झाले. बैठकीत नागरिकांच्या तक्रारींचा आढावा घेऊन तातडीने कारवाईची गरज असल्याचे सांगण्यात आले.
सर्व अनधिकृत अभ्यासिकांचे सर्वेक्षण –
महापालिकेच्या म्हणण्यानुसार, आता सर्व अनधिकृत अभ्यासिका आणि पीजी होस्टेल्सचे सर्वेक्षण करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. तसेच या सेवांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील आढावा बैठक 17 डिसेंबर रोजी होणार असून नागरिकांच्या त्रासाचे निराकरण करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.