Pune Cyber Crime RTO .apk File Scam: पुण्यातील देवाची उरुळी परिसरात राहणाऱ्या एका 37 वर्षीय महिलेसोबत सायबर भामट्यांनी अत्यंत धक्कादायक प्रकार घडवून आणला आहे. 28 जुलै रोजी तक्रारदार महिला मोबाईलवर व्हॉट्सॲप वापरत असताना, त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून 'RTO E-Challan App' नावाची .apk फाईल प्राप्त झाली. आपले काही ट्रॅफिक चलन बाकी आहे का, या शंकेने महिलेने ती फाईल डाउनलोड करून ओपन केली. फाईल उघडताच मोबाईलची स्क्रीन पूर्णपणे ब्लँक झाली आणि स्क्रीन पासवर्ड किंवा बँकेचे डिटेल्स कुणालाही शेअर न करताही भामट्यांनी मोबाईलचा रिमोट ॲक्सेस मिळवून बँक खात्यातून तब्बल 2,79,297 रुपयांचे अनधिकृत व्यवहार करून रक्कम लांबवली.
मेसेज पाहून धक्का; फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मोबाईल स्क्रीन पूर्ववत झाल्यानंतर बँकेकडून पैसे कपात झाल्याचे मेसेज धडाधड येऊ लागल्याने पीडित महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. कोणताही ओटीपी किंवा गुप्त माहिती शेअर न करता ही आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित महिलेच्या अर्जावरून पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तांत्रिक तपास सुरू आहे.
काय आहे सायबर गुन्हेगारांचा नवा 'APK' फाईल्सचा ट्रॅप ?
सायबर गुन्हेगार सध्या आरटीओ ई-चलन, वीज बिल, पीएम किसान किंवा बँक अपडेटच्या नावाने व्हॉट्सॲप आणि एसएमएसद्वारे 'APK Files' पाठवत आहेत. या फाईल्स फोनमध्ये इन्स्टॉल होताच मोबाईलमधील सर्व डेटा, बँक ॲप्स आणि मेसेजिंग सेवांचा ताबा नकळतपणे भामट्यांकडे जातो. यामुळे वापरकर्त्याला काही कळण्याच्या आतच खात्यातील सर्व पैसे गायब केले जातात, त्यामुळे ही नवीन पद्धत अत्यंत धोकादायक ठरत आहे.
अशा सायबर फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी पोलिसांचे आवाहन
नागरिकांनी अशा प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून काही महत्त्वाची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
व्हॉट्सॲप किंवा एसएमएसवर आलेल्या कोणत्याही अनोळखी .apk फाईलवर क्लिक करू नका किंवा ती फोनमध्ये डाउनलोड करू नका.
कोणतेही शासकीय वा बँक सेवांचे ॲप्स नेहमी केवळ 'Google Play Store' किंवा 'Apple App Store' वरूनच इन्स्टॉल करा.
ट्रॅफिक चलनाची खात्री करण्यासाठी केवळ अधिकृत शासकीय संकेतस्थळाचाच वापर करा.
अनोळखी नंबरवरून येणारे संशयास्पद मेसेज तात्काळ ब्लॉक करा आणि राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर तक्रार नोंदवा.