Pune Section 37 imposed : शहरातील वाढत्या आंदोलनांच्या आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने पुण्यात मोठे पाऊल उचलले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उद्या रात्रीपासून पुढील 14 दिवसांसाठी ‘जमावबंदीचे आदेश’ लागू करण्यात आले आहेत. पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात विविध राजकीय आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्याने शहरात आंदोलने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तसेच आगामी बकरी ईद व इतर सण शांततेत पार पाडण्यासाठी हा खबरदारीचा निर्णय घेण्यात आला आहे.
सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-1951 च्या कलम 37 (1) (2) (3) अन्वये हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. सामान्यतः हा आदेश 15 दिवसांपर्यंत लागू ठेवता येतो आणि तो पुढे वाढवण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी आवश्यक असते. या काळात शहरात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, मिरवणुका, आंदोलने आणि सभा घेण्यास प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे.
या गोष्टींवर असेल पूर्णपणे बंदी
– हत्यारे व स्फोटके बाळगणे: शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास सक्त मनाई आहे. याशिवाय दगड, स्फोटके, दाहक पदार्थ किंवा ज्वलनशील द्रव पदार्थ जमा करणे व सोबत बाळगण्यावर बंदी असेल.
– आक्षेपार्ह घोषणा व प्रदर्शन: मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे, सार्वजनिक टीका करणे, प्रक्षोभक गाणी गाणे किंवा वाद्य वाजवण्यास मनाई आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीच्या किंवा नेत्याच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे, पुतळा दहन करणे यावर बंदी घातली आहे.
– नैतिकता व सुरक्षेला धोका: शिष्टाचाराच्या विरोधात असणारे चित्रे, चिन्हे किंवा फलक वापरणे आणि प्रसारित करणे, ज्यामुळे सार्वजनिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल, अशी कृत्ये पूर्णपणे प्रतिबंधित असतील.
जर एखाद्या व्यक्तीने या नियमांचे उल्लंघन करून शस्त्र किंवा कोणतीही धोकादायक वस्तू बाळगल्यास पोलीस त्या वस्तू जप्त करू शकतात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर पोलिसांकडून थेट कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे पुणेकरांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि सार्वजनिक शांतता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.