Prithvi Shaw Engagement: भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज पृथ्वी शॉ याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाची खेळी खेळली आहे. दीर्घकाळापासून चर्चेत असलेल्या आपल्या नात्याला अधिकृत नाव देत, पृथ्वीने अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आकृती अग्रवालशी साखरपुडा केला आहे. रविवारी सोशल मीडियावरून त्याने ही आनंदवार्ता चाहत्यांसोबत शेअर केली.
“हीच माझी परफेक्ट इनिंग!”
आपल्या साखरपुड्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत पृथ्वीने एक भावूक कॅप्शन दिले आहे. तो म्हणतो, “क्रिकेटच्या मैदानावर षटकार मारण्यापासून ते आयुष्यभराच्या प्रवासात हिट राहण्यापर्यंत… आकृतीसोबतची ही माझी ‘परफेक्ट इनिंग’ आहे.” या फोटोंमध्ये पृथ्वी गुडघ्यावर बसून आकृतीला अंगठी घालताना दिसून येत आहे, ज्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अर्जुन तेंडुलकरच्या लग्नातील लूक चर्चेत
काही दिवसांपूर्वीच अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्यात पृथ्वी आणि आकृती एकत्र दिसल्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना उधाण आले होते. अर्जुनच्या लग्नानंतर अवघ्या तीन दिवसांतच पृथ्वीने आपल्या साखरपुड्याची घोषणा केल्याने क्रिकेट वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.
कोण आहे आकृती अग्रवाल?
पृथ्वीच्या आयुष्यातील ही नवी जोडीदार कोण, याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. आकृती अग्रवाल ही एक लोकप्रिय अभिनेत्री, फॅशन इन्फ्लुएंसर आणि कंटेंट क्रिएटर आहे. सोशल मीडियावरील रिल्स आणि शॉर्ट व्हिडिओंमुळे ती तरुणाईत कमालीची प्रसिद्ध आहे. यासोबतच तिने विविध म्युझिक व्हिडिओ आणि टीव्ही प्रकल्पांमध्येही आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे.