Ketan Agarwal Death Case: पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या धक्कादायक मृत्यूचा तपास करणाऱ्या पोलिसांनी शुक्रवारी लोहगड किल्ल्यावर घटनेचे प्रत्यक्ष री-क्रिएशन केले. या तपासादरम्यान पोलिसांनी मानवी आकाराच्या एका डमीचा (पुतळ्याचा) वापर करून केतन दरीत कसे पाडले, याचे अचूक चित्रण केले. पोलिसांच्या माहितीनुसार, 18 जून रोजी केतन ज्या ठिकाणाहून खाली पडले होते, त्याच हुबेहूब जागेवरून सुमारे 400 फूट उंचीवरून ती डमी दरीत खाली टाकण्यात आली. डमी खाली पडण्याचा मार्ग आणि आघाताची पद्धत यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी तसेच आरोपींची गुन्ह्यातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही प्रक्रिया राबवण्यात आली.
सियाचा इशारा अन् चेतनचा धक्का; पोलिसांकडून थरारक योजनेचा पर्दाफाश
केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी रचलेली योजना अचूकपणे अंमलात आणली गेली होती. ठरलेल्या कटानुसार, सियाने खाली बसून चेतनला इशारा द्यायचा होता आणि त्यानंतर चेतनने तातडीने वर येऊन केतनला मागून दरीत ढकलून द्यायचे होते. आरोपींनी पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली असून काय घडले आणि कसे घडले, हे त्यांनी स्पष्ट केले आहे; मात्र आपल्याला मृत्यूच्या दारात ढकलले जात आहे याची केतनला पुसटशीही कल्पना नव्हती, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
री-क्रिएशन प्रक्रियेमुळे सियाचा प्रत्यक्ष सहभाग स्पष्ट होणार
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक निष्कर्षानुसार, सियाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर चेतननेच केतनला प्रत्यक्षपणे ढकलले असावे, असा संशय आहे. मात्र, सियाचा सहभाग केवळ कट रचण्यापुरता मर्यादित होता की तिने स्वतः ढकलण्यात मदत केली, हे या सिम्युलेशन प्रक्रियेच्या वैज्ञानिक अहवालावरून निश्चित होणार आहे.
मूळचे महाराष्ट्रातील रहिवासी असलेले केतन आणि सिया यांचा याच वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात थाटामाटात साखरपुडा झाला होता. मात्र, सियाचे आधीपासूनच चेतन चौधरीसोबत प्रेमसंबंध होते आणि त्या दोघांनाही आपल्या भविष्यात केतन हा एक मोठा अडथळा वाटत होता, असा आरोप तपासकर्त्यांनी केला आहे. सुरुवातीला हा प्रकार केवळ एक अपघाती मृत्यू असल्याचे भासवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु सखोल तपासानंतर हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित हत्येचे असल्याचे उघड झाले आहे. दोन्ही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.