Chhatrapati Sambhajinagar news Police Recruitment : छत्रपती संभाजीनगरमधील SRPF पोलीस भरतीच्या मैदानावर सध्या खाकी वर्दी मिळवण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. याच गर्दीत अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आंधारसांगवी गावच्या नितीन नाथू चावरे हा 12 वी पास तरुणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कडाक्याच्या उन्हात आणि तापलेल्या मैदानावर इतर मुले महागडे शूज घालून धावत असताना, नितीन मात्र अनवाणी आणि काही वेळ चप्पल घालूनच 5 किलोमीटरच्या शर्यतीसाठी मैदानात उतरला होता. गरिबीमुळे साधे बूट खरेदी करण्याचीही ऐपत नसताना, केवळ जिद्दीच्या जोरावर तो वर्दीसाठी धावला.
पाच किलोमीटरची वेदनादायी धाव
नितीनच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत अशी त्याची परिस्थिती आहे. अशात सरावासाठी बूट मिळणे त्याच्यासाठी अशक्य होते. चप्पल घालून धावल्यामुळे त्याचे पाय सोलवटले होते आणि त्याला प्रचंड वेदना होत होत्या; मात्र, त्याच्या डोळ्यांसमोर आई-वडिलांचा संघर्ष आणि खाकी वर्दीचे स्वप्न होते. याच प्रेरणेतून त्याने चिकाटीने पूर्ण 5 किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण केले. त्याची ही धडपड पाहून मैदानावरील अनेकांच्या काळजाचे पाणी झाले.
पोलीस अधीक्षकांचा माणुसकीचा हात
भरती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी आलेले SRPF चे SP विक्रम साळी यांची नजर जेव्हा या तरुणावर पडली, तेव्हा त्यांनी त्याला जवळ बोलावले. “चप्पलवर का धावलास?” या साहेबांच्या प्रश्नावर, “साहेब, शूज घ्यायला पैसे नव्हते, पण पोलीस होण्याचे स्वप्न आहे,” असे भावूक उत्तर नितीनने दिले. हे ऐकून SP विक्रम साळी यांनी तातडीने त्याला नवे कोरे शूज उपलब्ध करून दिले. परिस्थितीच्या चटक्यांनी तावून सुलाखून निघालेल्या या तरुणाच्या जिद्दीला एका मोठ्या अधिकाऱ्याने दिलेली ही दाद माणुसकीचे दर्शन घडवणारी ठरली.
हेही वाचा – Bombay High Court: लाडकी बहीण योजना वादात! मुंबई हायकोर्टाचा सरकारला कडक इशारा; पैसे नसतील तर योजना…
सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श
विक्रम साळी यांनी केवळ नितीनलाच मदत केली नाही, तर अशा अनेक गरीब मुलांसाठी आता काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नाष्टा आणि जेवणाची व्यवस्थाही सुरू केली आहे. भरतीसाठी येणाऱ्या गरजू मुलांसाठी त्यांनी स्वतः काही बूट खरेदी करून ठेवले आहेत. पोलीस अधिकारी केवळ शिस्तप्रिय नसून ते संवेदनशीलही असू शकतात, हे साळी यांच्या या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भरतीसाठी आलेल्या शेकडो मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिस्थितीवर मात करणारी जिद्द
गेल्या 2 वर्षांपासून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणारा नितीन चावरे आज अनेकांसाठी प्रेरणा बनला आहे. “परिस्थिती माणसाला हरवू शकते, पण जिद्दीला नाही,” हे त्याने आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. पायाला झालेल्या जखमा विसरून खाकी वर्दीच्या दिशेने त्याने घेतलेली ही झेप यशस्वी होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचे हे कष्ट पाहून उपस्थित पोलीस कर्मचारी आणि इतर उमेदवारांनीही त्याचे कौतुक केले आहे.
हेही वाचा – Santosh Deshmukh: धक्कादायक! माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या घरात मध्यरात्री घरफोडी; पोलीस तपास सुरू