Flamingo Birds at Bamnoli: सातारा जिल्ह्यातील बामणोली परिसरात निसर्गाने आपली अपूर्व उधळण केली आहे. मजरे शेंबडी येथील त्रिवेणी संगमाजवळ शिवसागर जलाशयाच्या पात्रात परदेशी पाहुण्यांचे म्हणजेच फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांचे आगमन झाले आहे. पावसाच्या विश्रांतीनंतर धुक्याची मऊ शाल पांघरलेले डोंगर आणि शांत जलाशयावर विहार करणारे हे गुलाबी-पांढरे पक्षी संपूर्ण परिसराच्या सौंदर्यात भर घालत आहेत. दरवर्षीपेक्षा या वेळी कोयनेच्या फुगवठ्यात त्यांची संख्या कमालीची वाढलेली दिसत आहे.
पर्यटन व्यवसायाला नवसंजीवनी
या पक्ष्यांच्या आगमनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच राज्यभरातून पक्षीनिरीक्षक आणि छायाचित्रकार बामणोलीत दाखल होत आहेत. जलाशयातील संथ पाण्यात या पक्ष्यांचे थवे पाहणे पर्यटकांना भुरळ पाडत आहे. पर्यटकांच्या वाढत्या राबतामुळे स्थानिक बोट चालकांपासून ते उपाहारगृह चालकांपर्यंत सर्वच व्यवसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बोटिंगच्या माध्यमातून या पक्ष्यांना जवळून न्याहाळण्याची संधी उपलब्ध झाल्याने स्थानिक पर्यटनाला मोठी गती मिळाली आहे.
निसर्गप्रेमी अन् प्रशासनाचे आवाहन
फ्लेमिंगो हे पक्षी मानवी हालचालींबाबत अत्यंत संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. पर्यटकांनी बोटिंगदरम्यान सुरक्षित अंतर राखावे, लाऊडस्पीकर किंवा मोठा आवाज करू नये आणि पक्ष्यांना घाबरवणारे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
अनुकूल वातावरणामुळे वाढता मुक्काम
शिवसागर जलाशयातील मुबलक खाद्य आणि सुरक्षित पर्यावरणीय परिस्थितीमुळे या पक्ष्यांचा मुक्काम दीर्घकाळ टिकून आहे. बामणोली वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोयनेच्या जंगलातील नैसर्गिक समृद्धी आणि अन्नाची उपलब्धता यांमुळे मे महिन्यापासूनच येथे फ्लेमिंगोचे दर्शन घडत आहे. जर अशीच पोषक परिस्थिती कायम राहिली, तर दरवर्षी या भागात मोठ्या संख्येने परदेशी पक्षी येण्याचा मार्ग मोकळा होईल.