PNG Pipeline Blast: पिंपरी-चिंचवड शहरातील मोहन नगर परिसरामध्ये आज दुपारी गॅस पाईपलाईनचा अचानक मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. MNGL कंपनीच्या PNG गॅस पाईपलाईनमध्ये हा स्फोट झाला असून, या दुर्घटनेत एका दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे. या भीषण घटनेची सर्व दृश्ये परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दुपारी 1 च्या सुमारास घडला थरार
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 1 वाजेच्या सुमारास मोहन नगर भागातून जाणाऱ्या PNG गॅस पाईपलाईनचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, पाईपलाईनवर टाकलेली माती आणि मोठमोठे दगड प्रचंड वेगाने हवेत फेकले गेले. नेमक्या त्याच वेळी रस्त्यावरून दुचाकीवरून जाणारा एक व्यक्ती या दगडांच्या आणि मातीच्या माऱ्यात सापडला. दगड अंगावर पडल्याने हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांमध्ये संताप
पाईपलाईन टाकण्याचे काम किंवा देखभाल सुरू असतानाच अशा प्रकारे स्फोट होत असल्याने स्थानिक नागरिकांनी MNGL प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “जर अशा प्रकारे भरवस्तीत स्फोट होत असतील, तर सर्वसामान्यांच्या जिवाची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. या दुर्घटनेनंतर कंपनीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा – Latur Crime : पत्नीवर अत्याचार, तक्रार घेण्यास पोलिसांचा नकार; हतबल शेतकऱ्याने जीवन संपवलं
सीसीटीव्ही फुटेजमुळे घटनेची भीषणता समोर
या स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यामध्ये जमिनीतून मातीचा कारंजा उडाल्याप्रमाणे दगड आणि माती हवेत उडताना दिसत आहेत. केवळ काही सेकंदांचा फरक असता, तर मोठी जीवितहानी झाली असती, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. संबंधित कंपनीने सुरक्षेचे निकष पाळले होते का, याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.