West Bengal Election Violence 2026 : पश्चिम बंगालमधील 294 विधानसभा जागांसाठी गुरुवारी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली, मात्र विविध जिल्ह्यांतून हिंसाचाराच्या बातम्या समोर आल्या आहेत. सिलिगुडी येथील जगदीशचंद्र विद्यापीठातील मतदान केंद्राबाहेर तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली, ज्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेत काही काळ व्यत्यय आला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) जवानांनी तातडीने हस्तक्षेप करत जमावाला पांगवले आणि परिसरात शांतता प्रस्थापित केली. राज्यातील या हाय-व्होल्टेज निवडणुकीत पहिल्याच दिवशी तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.
मुर्शिदाबादमध्ये बॉम्बफेक आणि वाहनांची तोडफोड
मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नावदा भागात परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली होती. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या क्रूड बॉम्बच्या स्फोटात एक महिला जखमी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. मतदानाच्या दिवशी ‘आम जनता उन्नयन पार्टी’चे (AJUP) अध्यक्ष हुमायून कबीर हे या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करत असताना त्यांच्या कारवर तृणमूल समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी दोन्ही बाजूच्या समर्थकांनी लाठ्याकाठ्यांचा वापर केला आणि दगडफेक करत रस्त्यांवरील वाहनांचे नुकसान केले. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमाव पांगवला असला तरी कबीर यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या हकालपट्टीसाठी तिथेच धरणे धरले.
#WATCH | West Bengal Elections 2026 | Clash broke out between the TMC and Aam Janata Unnayan Party (AUJP) party workers in Murshidabad. pic.twitter.com/Lfn7zIOzmX — ANI (@ANI) April 23, 2026
मतदानानंतर वृद्ध महिलेचा मृत्यू
पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील केशपूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 55 वर्षांच्या इशरतन बीबी या वृद्ध महिलेचा मतदान केंद्राबाहेर आल्यानंतर मृत्यू झाला. त्यांचे पती नवाबजान अली यांच्या म्हणण्यानुसार, मतदार यादीत केवळ त्यांच्या पत्नीचेच नाव समाविष्ट होते, तर स्वतःसह कुटुंबातील इतर चार सदस्यांची नावे त्यातून वगळण्यात आली होती. “मी तिला मतदानासाठी घेऊन गेलो होतो. माझे नाव मतदार यादीत नसल्यामुळे, मी मतदान केंद्रातून बाहेर पडलो आणि बाहेरच उभा राहिलो. मतदान करून बाहेर आल्यानंतर आणि एका ‘टोटो’मध्ये (रिक्षा) बसल्यावर माझ्या पत्नीचा मृत्यू झाला,” असे त्यांनी सांगितले..
हेही वाचा – Luggage Lost Helpline: रेल्वे प्रवासात बॅग हरवली आहे?; घाबरू नका! ‘या’ सोप्या ट्रिकने पुन्हा मिळवा तुमची बॅग
बुथ जॅमिंग आणि उमेदवारावर हल्ला
दक्षिण दिनाजपूरमधील कुमारगंज येथे भाजप उमेदवार सुवेंदू सरकार यांनी तृणमूल कार्यकर्त्यांवर बुथ जॅमिंगचे आरोप केले. “माझ्या पोलिंग एजंटला आत जाऊ दिले जात नाहीये,” असा दावा करत सरकार एका व्यक्तीचा पाठलाग करताना दिसले. यादरम्यान तृणमूल समर्थकांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजपने केला आहे. निवडणूक आयोगाच्या नियंत्रण कक्षातून मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) वेबकास्टिंगद्वारे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून नावदा येथील तणावाचा सविस्तर अहवाल मागवला आहे.
बंगालमध्ये सत्तेसाठी चुरस
पश्चिम बंगालमधील या निवडणुकीचे काही महत्त्वाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत:
ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस सलग 4 व्यांदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहे.
भाजपने यावेळी संपूर्ण ताकद लावत सत्तापालटाचा निर्धार केला आहे.
दोन टप्प्यांत होणाऱ्या या निवडणुकीत एकूण 1,478 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
या सर्व जागांची मतमोजणी 4 मे रोजी होणार असून तोपर्यंत बंगालमधील राजकीय वातावरण तापलेलेच राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – Women Cricketer Arrested: महिला क्रिकेटपटूचा मुंबईतील उद्योगपतीला 63 लाखांचा गंडा, गुन्हे शाखेकडून कारवाई