Pune Land Scam: पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारला सादर करण्यात आलेल्या मुठे समितीच्या अहवालात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे नाव नाही. त्यामुळे त्यांना क्लीन चीट मिळाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मुंद्राक अधिकारी राजेंद्र मुठे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या या अहवालात काही प्रमुख व्यक्तींना दोषी ठरवण्यात आले असले तरी, पार्थ पवार यांचा कोणताही उल्लेख नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनीचे दुसरे संचालक दिग्विजय पाटील, बिल्डर शीतल तेजवानी तसेच निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू यांना चौकशी अहवालात थेट दोषी ठरवण्यात आले आहे.
दरम्यान, मुंढवा जमिनीच्या व्यवहारातील अनियमिततेची तपासणी करण्यासाठी महसूल विभागाने तीन स्वतंत्र समित्या नेमल्या होत्या. त्यापैकी मुठे समितीला सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. हा अहवाल विभागीय समितीकडे पोहोचला असून, नवीन कोणतीही नावे या तपासात समोर आली नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणातील जमीन कोरेगाव पार्कसारख्या महागड्या भागाजवळची असून तिची किंमत बाजारभावानुसार जवळपास 1800 कोटी रुपये मानली जाते. मात्र ती फक्त 300 कोटींमध्ये खरेदी करण्यात आल्याचा आरोप चौकशीत नमूद आहे. इतकेच नव्हे, तर सुमारे 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटीही कागदोपत्री प्रक्रियेतून वाचवल्याचा गंभीर आरोप आहे. तथापी, अहवालानुसार हा संपूर्ण व्यवहार अवघ्या 500 रुपयांत झाल्याचे धक्कादायक तपशीलही समोर आले आहेत. या प्रकरणात पार्थ पवारांची अमेडिया कंपनी चर्चेत आली होती, मात्र समितीच्या निष्कर्षानुसार त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा आढळला नाही.