बीड: दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या परंपरेनुसार, गेल्या 11 वर्षांपासून पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात बीड येथील सावरगाव येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याप्रमाणेच मराठवाड्यात पंकजा मुंडेंच्या या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असते. यंदाच्या मेळाव्याला पंकजा मुंडेंचे बंधू आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही व्यासपीठावर उपस्थिती लावली.
'मी कुणाचा रुपया घेतला नाही, कुणाची टक्केवारी घेतली नाही, कुणाच्या चहात मिंधी नाही, पण भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडेंचं स्मारक उभा केलंय, असे पंकजा यांनी म्हटलं. सरकारी कामातून हे उभं राहिलं नाही, तर ऊस तोडणाऱ्यांच्या घामातून हे मंदिर उभा केलंय, असेही पंकजा यांनी म्हटलं. पंकजा मुंडेंनी पूरग्रस्त भागातील पीडित शेतकऱ्यांना उद्देशूनही भाषण केलं. तुम्ही सर्वजण काही चिंता करू नका,' असे म्हणत पंकजा मुंडेंनी भावनिक शायरी ऐकवली.
जब देखती हूँ भुके बच्चे,
फटे हुए कपडों मे माँ,
गरिबी मे तडपता परिवार
मैं खून के आँसू रोती हूँ,
मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ… अशी शायरी पंकजा यांनी यावेळी म्हटली.
पंकजा मुंडेंकडून 'जातीवादाच्या राक्षसा'वर टीका
धनंजय मुंडेंनंतर भाषण करताना पंकजा मुंडेंनी दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, "मी एखादा रेकॉर्ड मोडला, तर पुढचा रेकॉर्ड तयार करण्यासाठी मी काम करते." भगवान बाबांच्या जन्मगावी, सावरगावमध्ये, त्यांनी कुणाचा रुपया न घेता ऊसतोड मजुरांच्या घामातून भव्य मूर्ती आणि स्मारक उभारल्याचे त्यांनी नमूद केले.
पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणात थेट जातीवादाच्या राजकारणावर प्रहार केला. त्या म्हणाल्या, "आपण नवरात्रात 9 दिवस देवीची पूजा केली. त्या देवीने महिषासुर आणि रक्तबीजासारखा राक्षस संपवला. आजच्या कलियुगात रक्तबीजासारखा राक्षस जन्माला आलाय. हा राक्षस तुमच्या सर्वांच्या बुद्धीत जन्माला आलाय, ज्यामुळे जातीवाद आणि धर्मावादाचे राक्षस उभे राहत आहेत. दुर्गेची पूजा करताना, रक्तबीजासारखे राक्षस संपविण्याची शक्ती आम्हाला दे, हीच माझी मागणी आहे." भविष्यात जातींना एकत्र गुंफण्याचे काम आपल्याकडून झाले पाहिजे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
धनंजय मुंडेंची 'मीडिया ट्रायल'वर टीका
धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात, 'मधल्या काळात माझ्यावर मीडिया ट्रायल सुरू होती, मी 250 दिवस शांत होतो, तेव्हा माझी बहीण आधार देत होती,' असे सांगत पंकजा मुंडेंनी आपल्याला आधार दिल्याचे नमूद केले. ते पुढे म्हणाले, "माझ्या विरोधात घोटाळे काढले, कोर्टात मला क्लीनचीट मिळाली, पण कोर्टाने याचिका करणाऱ्यांना 1 लाख रुपयांचा दंड केला. एवढं होऊन देखील मी शिक्षा भोगत आहे."
वनविभागाची 4 हेक्टर जागा भगवानगडासाठी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार
या मेळाव्यादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट, खरवंडी येथील 4 हेक्टर वनविभागाची जागा सामाजिक विकासासाठी देण्याच्या मागणीला यश आल्याची घोषणा ट्विटरवरून केली. यावर पंकजा मुंडेंनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. "देवेंद्र फडणवीस, तुमचे भगवान बाबांच्यावर आणि मुंडे साहेबांच्यावर इतके प्रेम पाहून सद्गदित होते. तुम्ही केलेले काम सदैव स्मरणात राहील. तिथे समाज-कल्याण होईल असे प्रकल्प होतील. कोटी कोटी धन्यवाद" असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा – Beed Dasara Melava : पंकजा मुंडे मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर झळकले; अंजली दमानियांची जोरदार टीका
श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट, खरवंडी येथील वनविभागाची 4 हेक्टर जागा भक्तगणाच्या सेवासुविधांसाठी, रुग्णालय, प्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक विकासासाठी देण्याची मागणी महंत नामदेवशास्त्री महाराज आणि संस्थानने माझ्याकडे केली होती. त्याचा केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करुन अखेर आज त्याला यश आले. केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाने त्याची अधिसूचना आज प्रसिद्ध केली. मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवजी यांचे मनापासून आभार मानतो. श्री संत भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होत आणि उद्याच्या विजयादशमीच्या पूर्वसंध्येला ही माहिती देताना मला अतिशय आनंद होतो आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. यावर पंकजा मुंडेंनी ट्विट करत त्यांचे आभार मानले.