Pandharpur wari 2026 No Vehicle Zone : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सुरक्षितता आणि सोहळा सुकर व्हावा, यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा पाऊल उचलले आहे. आषाढी यात्रा काळात पंढरपूर शहरात तब्बल 12 ते 15 लाख भाविक दाखल होत असतात. विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्या या अथांग गर्दीला कोणताही अडथळा येऊ नये आणि अपघाताचा धोका टाळता यावा, या उद्देशाने मंदिर परिसराला 'वाहन प्रतिबंध क्षेत्र' (नो व्हेहिकल झोन) म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. कार्तिकेयन यांनी आपत्ती व्यवस्थापन 2005 मधील कलम 34 (ब) नुसार हा अधिकृत आदेश जारी केला असून, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.
कधी आणि कोणत्या भागात असेल बंदी?
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर शहरातील श्रीकृष्ण मंदिर, चौफाळा ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पश्चिमद्वार आणि मंदिर परिसर ते महाद्वार परिसर या भागात वाहनांना पूर्णपणे बंदी असेल. हा नियम दोन टप्प्यांत लागू केला जाणार आहे.
– पहिल्या टप्प्यात 1 ते 15 जुलै दरम्यान सकाळी 5 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत या परिसरात वाहने नेण्यास मनाई असेल.
– दुसऱ्या टप्प्यात, म्हणजेच 15 जुलैनंतर ते थेट 29 जुलैपर्यंत हा संपूर्ण परिसर 24 तास वाहन प्रतिबंध क्षेत्र म्हणून लागू राहील.
– या भागात भाविक पायी चालत जात असल्याने प्रदक्षिणा मार्गावर दुचाकी किंवा चारचाकी वाहने पार्क करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
कोणाला मिळणार सवलत आणि पासेस?
या कडक नियमांमधून केवळ शासकीय सेवा, अत्यावश्यक सेवा, मंदिर परिसरात राहणारे स्थानिक नागरिक आणि मंदिरात कामकाज करणारे कर्मचारी यांनाच दिलासा देण्यात आला आहे. मात्र, यासाठी त्यांना पोलीस प्रशासनाकडून विशेष पास घ्यावे लागतील. मंदिर परिसरातील नागरिकांना देखील ठरवून दिलेल्या जागेतच आपली वाहने पार्क करावी लागणार आहेत. शासकीय आणि मंदिर समितीच्या वाहनांचा वापर केवळ कर्तव्यावर असतानाच करता येईल; इतर वैयक्तिक किंवा अवाजवी कारणांसाठी या वाहनांचा वापर केल्यास कडक कारवाई केली जाईल, असे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा – Ashadhi Wari 2026: आषाढी वारी पालखी सोहळ्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठे बदल; 'हे' आहेत पर्यायी मार्ग
व्यापारी आणि व्हीआयपींसाठी विशेष नियमावली
मंदिर परिसरात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना भाविकांना त्रास होणार नाही, याची पूर्ण काळजी घ्यावी लागणार आहे. त्यांना मालाची ने-आण करण्यासाठी पोलिसांशी चर्चा करून एक ठराविक वेळ ठरवून दिली जाईल. दुसरीकडे, आषाढी वारीसाठी येणाऱ्या राजशिष्टाचार पात्र (व्हीआयपी) व्यक्ती तसेच दिव्यांग भाविकांसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत विशेष व्यवस्था केली जाईल. या भाविकांना श्रीकृष्ण मंदिर आणि चौफाळ्यापासून मंदिरापर्यंत ने-आण करण्यासाठी पर्यावरणपूरक (इलेक्ट्रिक) वाहनांची सोय प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.
नियम मोडल्यास थेट गुन्हा दाखल होणार
स्थानिक रस्ते अरुंद असल्याने आणि गर्दीच्या वेळी वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. पंढरपूर नगर परिषदेमार्फत वाहन पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था केली जात असून पासधारकांनीही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. जर कोणी या वाहतूक नियमांचे किंवा प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 सह 'भारतीय न्याय संहिता 2023' मधील कलम 223 अन्वये कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
हेही वाचा – Pandharichi Wari:मोठी बातमी! वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दिंड्यांना सरकारकडून 2.80 कोटींचा निधी मंजूर