Pandharpur Ashadhi Wari 2026: आषाढी एकादशी यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो सामान्य वारकऱ्यांचे दर्शन सुलभ व्हावे, यासाठी प्रशासनाने यंदा अत्यंत कडक पावले उचलली आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या आदेशानुसार, आज म्हणजेच 15 जुलैपासून ते 29 जुलै 2026 पर्यंत विठ्ठल-रुक्मिणीचे व्हीआयपी (VIP) दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. या कालावधीत कोणताही राजकीय नेता, वरिष्ठ अधिकारी किंवा मंदिर समिती सदस्यांच्या शिफारस पत्राद्वारे व्हीआयपी प्रवेश दिला जाणार नाही. जर कोणी या आदेशाचे उल्लंघन करून मागच्या दाराने व्हीआयपी प्रवेश देण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी मंदिर परिसरात विशेष सीसीटीव्ही (CCTV) आणि 2 वर्ग-1 दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
उद्यापासून विठूराया चोवीस तास देणार दर्शन; वारकऱ्यांची आस पूर्ण होणार
उद्या म्हणजेच 16 जुलैपासून विठ्ठलाचे दर्शन नेहमीचे नित्योपचार वगळता संपूर्ण 24 तास खुले केले जाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. शेकडो मैल पायी प्रवास करून येणाऱ्या भाविकांना विठूरायाच्या दर्शनाची तीव्र आस असते, त्यामुळे देव स्वतः भक्तांच्या भेटीसाठी चोवीस तास उभा ठाकणार आहे. या प्रवासात देवाला उभ्या-उभ्या त्रास होऊ नये आणि पाठीला आराम मिळावा म्हणून पाठीशी लोड (उशी) लावण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. 16 जुलै रोजी देवाचा पलंग काढला जाईल आणि वारीचा सोहळा संपल्यानंतर म्हणजेच पौर्णिमेला देवाचा शिणवठा घालवण्यासाठी प्रक्षाळपूजा करून हा लोड काढला जाईल व पुन्हा पलंग लावला जाईल.
पंढरपूर परिसरात पहिल्यांदाच तब्बल 15 दिवस मांसविक्री बंद
वारकरी संप्रदाय आणि विविध महाराज मंडळींच्या आग्रही मागणीची दखल घेत प्रशासनाने पंढरपुरात एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापूर्वी केवळ 3 ते 4 दिवसांसाठी राहणारी मांसविक्री बंदी यंदा पहिल्यांदाच तब्बल 15 दिवसांसाठी लागू करण्यात आली आहे. या संदर्भातील सविस्तर निर्णय खालीलप्रमाणे आहे:
– बंदीचा कालावधी: 15 जुलै ते 29 जुलै या संपूर्ण यात्रा कालावधीत ही बंदी लागू राहील.
– प्रतिबंधित बाबी: पंढरपूर शहर आणि आजूबाजूच्या परिसरात सर्व प्रकारचे मांस, मटण, मासे विक्री, प्राण्यांची कत्तल आणि मांसजन्य पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असेल.
– कारवाईचे आदेश: उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत.
भाविकांना प्रशासनाचे सहकार्याचे आवाहन
ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता पंढरीच्या दिशेने येणाऱ्या संतांच्या पालख्या आता पंढरपूरच्या अगदी समीप पोहोचल्या आहेत. गेल्या 2 महिन्यांपासून प्रशासनाकडून सुरू असलेल्या वारीच्या नियोजनाची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सर्व राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस, पत्रकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी या वारीच्या काळात व्हीआयपी दर्शनाचा कोणताही आग्रह न धरता सामान्य भाविकांप्रमाणे मुख दर्शन, कळस दर्शन किंवा दर्शन रांगेतूनच जाऊन प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे.