Palghar School Student Death After Marathon : पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे शाळेच्या क्रीडा महोत्सवात जिद्दीने धावून यश मिळवल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच एका उमलत्या मुलीचा अंत झाला. उंबरगाव येथील भारती अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या 15 वर्षीय रोशनी गोस्वामी हिने मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण या विजयाचा जल्लोष करण्यापूर्वीच काळाने तिच्यावर झडप घातली. शर्यत संपल्यानंतर तिला श्वास घेण्यास प्रचंड त्रास झाला आणि ती मैदानावरच बेशुद्ध पडली.
विजयाचा आनंद ठरला अखेरचा
शनिवारी, 3 जानेवारी रोजी शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता 10 वीत शिकणाऱ्या रोशनीने मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन आपले पूर्ण कसब पणाला लावले होते. तिने शर्यतीचे अंतर यशस्वीपणे पार करत तिसरे स्थानही निश्चित केले. मात्र, शर्यतीची अंतिम रेषा ओलांडताच तिला धाप लागली आणि ती खाली बसली. काही क्षणातच तिची हालचाल थांबल्याने क्रीडांगणावरील उत्साहाचे वातावरण भीती आणि चिंतेमध्ये बदलले.
हेही वाचा – No Network No Vote : 'नेटवर्क नाही, मत नाही!', रत्नागिरी जिल्ह्यातील गावकऱ्यांचा निवडणुकीवर बहिष्कार
वैद्यकीय उपचार आणि प्राथमिक अंदाज
रोशनी बेशुद्ध पडताच शाळा प्रशासनाने तिला तातडीने उपचारांसाठी गुजरात मधील उंबरगाव येथील रुग्णालयात हलवले. दुर्दैवाने, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. धावल्यामुळे आलेल्या शारीरिक ताणामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील उंबरगाव आणि तलासरी परिसरात मोठी शोककळा पसरली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या क्रीडा स्पर्धेसाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून आधीच घोलवड पोलिसांकडून बंदोबस्त मागवण्यात आला होता आणि घटनास्थळी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. याप्रकरणी सध्या घोलवड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मैदानी खेळांची आवड जोपासणाऱ्या आणि आपल्या क्रीडागुणांना वाव देणाऱ्या एका कष्टाळू विद्यार्थिनीचा असा करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा – Ratnagiri News : नववर्षाच्या स्वागतासाठी गेले पण…! गुहागरच्या समुद्रात पर्यटकाचा करुण अंत