Faiz Hameed: पाकिस्तानातील सत्ताकेंद्रात मोठ्या घडामोडी उलगडत असून माजी आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल (निवृत्त) फैज हमीद यांना फील्ड जनरल कोर्ट मार्शलने 14 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे पाक संरक्षण दलप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पूर्वीच्या शक्तिशाली गटावर घेतलेल्या कठोर कारवाईचे संकेत अधिक स्पष्ट झाले आहेत. हमीद हे माजी लष्करप्रमुख कमर बाजवा यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी मानले जात होते.
रावळपिंडी येथून आयएसपीआरने जारी केलेल्या निवेदनानुसार, हा कोर्ट मार्शल 12 ऑगस्ट 2024 रोजी सुरू झाला आणि तब्बल 15 महिन्यांहून अधिक काळ चालला. पाकिस्तानच्या राजकारणातही प्रभाव टाकणाऱ्या हमीद यांच्यावर राजकीय हस्तक्षेप करणे, अधिकृत गुपित कायद्याचे उल्लंघन, सरकारी अधिकारांचा गैरवापर आणि व्यक्तींना चुकीचा त्रास देणे हे चार गंभीर आरोप लावण्यात आले होते.
हेही वाचा – Prada – kolhapuri chappal : कोल्हापुरी चप्पल जगात भारी! प्रसिद्ध फॅशन ब्रँड प्राडाचा भारतीय संस्थांशी करार
दीर्घ सुनावणी आणि पुरावे तपासल्यानंतर लष्करी न्यायालयाने हमीद यांना सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवले. न्यायालयाने सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन केल्याचे आयएसपीआरने स्पष्ट केले असून हमीद यांना पूर्ण कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यात आली होती. 11 डिसेंबर रोजी शिक्षा घोषित झाली असून त्यांना अपील करण्याचा अधिकार अद्याप कायम आहे. निवेदनात असेही म्हटले आहे की, हमीद यांनी राजकीय गटांशी समन्वय साधत देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य अतिरिक्त कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. मे 2023 मध्ये इम्रान खान यांच्या अटकेनंतर उसळलेल्या हिंसाचाराशीही हमीद यांचा संबंध असल्याचा आरोप टीकाकारांकडून वारंवार केला जात आहे.
हेही वाचा – Geminids Meteor Shower : उल्कावर्षाव भारतातून ऑनलाईन कसा पाहता येईल? 13-14 डिसेंबरच्या रात्री खगोलीय चमत्कार
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्पष्ट टिप्पणी केली. “फैज हमीद आणि जनरल बाजवा यांनी जे बीज पेरले, त्याचे परिणाम पाकिस्तानला अनेक वर्षे भोगावे लागतील.” ही शिक्षा पाकिस्तानच्या लष्करी आणि राजकीय समीकरणात मोठा बदल घडवणारी ठरू शकते, अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.