Army Chief Warns Pakistan: ‘पाकिस्तानने ठरवावं भूगोलाचा भाग व्हायचं की, इतिहासाचा…’; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा कडक इशारा

भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला आतापर्यंतचा सर्वात कठोर इशारा दिला आहे.

Army Chief Warns Pakistan: ‘पाकिस्तानने ठरवावं भूगोलाचा भाग व्हायचं की, इतिहासाचा…’; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा कडक इशारा

Army Chief Warns Pakistan: भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला आतापर्यंतचा सर्वात कठोर इशारा दिला आहे. दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या पाकिस्तानच्या वृत्तीवर कडाडून टीका करताना त्यांनी स्पष्ट केले की, 'जर इस्लामाबादने आपल्या सीमापार कारवाया थांबवल्या नाहीत, तर त्यांना जगाच्या नकाशावर भूगोलाचा भाग म्हणून कायम राहायचे आहे की इतिहासाचा भाग बनायचे आहे,' याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. 'ऑपरेशन सिंदूर'ला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

दहशतवादाविरोधात भारताची आक्रमक भूमिका
कार्यक्रमादरम्यान लष्करप्रमुखांना विचारण्यात आले की, जर गेल्या वर्षीच्या 'ऑपरेशन सिंदूर'सारखी स्थिती पुन्हा उद्भवली, तर लष्कराची रणनीती काय असेल? यावर उत्तर देताना जनरल द्विवेदी म्हणाले की, "दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि भारताच्या विरोधात कट रचणे पाकिस्तानने सुरूच ठेवले, तर त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असतील. पाकिस्तानने आता स्वतःचे भवितव्य ठरवण्याची वेळ आली आहे." लष्करप्रमुखांचे हे विधान म्हणजे पाकिस्तानला दिलेला शेवटचा इशारा असल्याचे संरक्षण वर्तुळात मानले जात आहे.

'ऑपरेशन सिंदूर'च्या आठवणींनी पाकिस्तान हादरला
गेल्या वर्षी 6 आणि 7 मे च्या मध्यरात्री भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' ही धाडसी मोहीम राबवली होती. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय जवानांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. या 'प्रिसिजन स्ट्राईक्स'मुळे पाकिस्तानची मोठी नामुष्की झाली होती आणि त्यांचे अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त झाले होते. या मोहिमेने भारताची 'शून्य सहनशीलता' (Zero Tolerance) ही भूमिका जगासमोर पुन्हा एकदा सिद्ध केली होती.

हेही वाचा – ISIS Commander Death: अमेरिकेची मोठी कारवाई; ISIS चा टॉप कमांडर अबू-बिलाल अल-मिनुकीला संपवलं, कसा रचला सापळा?

दहशतवादी अड्ड्यांवर भारताची करडी नजर
लष्करप्रमुखांच्या या विधानामुळे सीमेवर पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता आहे, परंतु यामुळे भारतीय लष्कराचा आत्मविश्वास आणि सज्जता दिसून आली आहे. 'ऑपरेशन सिंदूर'च्या वर्षपूर्तीनंतर भारताने आपली तांत्रिक आणि गुप्तचर क्षमता अधिक मजबूत केली आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही चिथावणीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज असून, आता चेंडू पाकिस्तानच्या कोर्टात आहे, असेच लष्करप्रमुखांनी आपल्या भाषणातून सुचित केले आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number