India Allowed Pakistani Aircraft : भारताने मानवतेच्या आधारावर पाकिस्तानला एक महत्त्वपूर्ण परवानगी दिली आहे. भारत आणि पाकिस्तानने एकमेकांच्या विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद ठेवले असतानाही, भारताने श्रीलंकेला (Sri Lanka) मदत सामग्री घेऊन जाणाऱ्या पाकिस्तानी विमानांना आपल्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. 'दितवाह' चक्रीवादळामुळे (Cyclone Ditwah) प्रभावित झालेल्या श्रीलंकेला मदत पोहोचवण्यासाठी भारत 'ऑपरेशन सागर बंधू' (Operation Sagar Bandhu) अंतर्गत मदत सामग्री (Relief Material) पाठवत आहे.
पाकने मागितली होती परवानगी
भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानने सोमवारी सुमारे 13.00 वाजता (IST) भारतीय हवाई क्षेत्रावरून (Indian Airspace) उड्डाण करण्याची विनंती केली होती. श्रीलंकेला मानवी मदत (Humanitarian Aid) पोहोचवण्याच्या उद्देशाने ही परवानगी त्याच दिवशी मागण्यात आली होती. मात्र, पाकिस्तानी माध्यमांनी भारताने पाकिस्तानला ही परवानगी दिली नसल्याचा दावा केला. भारतीय अधिकाऱ्यांनी या वृत्तांचे खंडन केले आहे. यामध्ये असा दावा केला गेला होता की, भारताने आपल्या एअरस्पेसचा वापर करण्याची परवानगी पाकिस्तानला नाकारली होती. भारताने दिलेली ही मंजुरी पूर्णपणे मानवतावादी दृष्टिकोनातून दिली होती, जी पाकिस्तानने भारतीय एअरलाईन्सवर बंदी घातलेली असतानाही देण्यात आली. याशिवाय, भारताच्या विमानांना पाकिस्तानने अनेकदा संकटाच्या वेळी लँडिंगची परवानगी दिली नव्हती, हेही विसरून चालणार नाही.
श्रीलंका नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहे
दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात पुराचा सामना करावा लागत आहे. श्रीलंकेत आतापर्यंत किमान 334 लोकांच्या मृत्यू झाल्याचे वृत्त मिळाले आहे. राजधानी कोलंबोच्या काही भागांत वाढत्या पाण्याशी तेथील अधिकारी संघर्ष करत आहेत.
भारताची 'ऑपरेशन सागर बंधू'अंतर्गत मदत
सायक्लोन दितवाहचा सामना करण्यासाठी भारताने 'ऑपरेशन सागर बंधू' अंतर्गत श्रीलंकेला एकूण 53 टन राहत सामग्री पाठवली आहे. एका अधिकृत माहितीनुसार, भारताने कोलंबो येथे असलेल्या आपल्या दोन इंडियन नेव्हीच्या जहाजांमधून (Indian Navy Ships) 9.5 टन आपत्कालीन शिधा पाठवला आहे. तसेच, तंबू, ताडपत्री, ब्लँकेट, स्वच्छता किट, रेडी-टू-ईट खाद्यपदार्थ, औषधे आणि सर्जिकल इक्विपमेंटसह 31.5 टन अधिक मदत सामग्री पोहोचवण्यासाठी इंडियन एअर फोर्सची (Indian Air Force) तीन विमाने तैनात करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, नवी दिल्लीने इंडियन नेव्हीच्या 'सुकन्या' (Sukanya) नावाच्या जहाजावर (त्रिंकोमालीमध्ये) 12 टन अतिरिक्त मदत सामग्री पाठवली आहे, ज्यामुळे एकूण 53 टन सामग्री श्रीलंकेला पोहोचली आहे.