Pandharpur: पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या अक्षम्य हलगर्जीपणाचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका 6 वर्षाच्या मुलाच्या उजव्या हाताच्या बोटावर शस्त्रक्रिया करणे अपेक्षित असताना, डॉक्टरांनी चक्क त्याच्या डाव्या हाताचं बोट कापून काढलं आहे. या घटनेमुळे पीडित मुलाच्या कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला असून, संपूर्ण पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
शाहू सुनील दंदाडे या 6 वर्षीय मुलाला जन्मजात दोन्ही हातांना 6 बोटे आहेत. यापैकी त्याच्या उजव्या हाताचे जास्तीचे बोट दुखत असल्याने, ते शस्त्रक्रिया करून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी अत्यंत बेजबाबदारपणा दाखवत उजव्या हाताऐवजी त्याच्या डाव्या हाताचे बोट कापून टाकले. शस्त्रक्रिया संपल्यानंतर मुलाच्या हातावरील पट्टी पाहिल्यावर हा गंभीर प्रकार पालकांच्या लक्षात आला.
दंदाडे कुटुंबीयांची तक्रार आणि संताप
उजव्या हाताच्या दुखणाऱ्या बोटाऐवजी धडधकट असलेल्या डाव्या हाताचे बोट काढल्यामुळे दंदाडे कुटुंबीयांनी रुग्णालयात तीव्र संताप व्यक्त केला आहे. डॉक्टरांच्या या हलगर्जीपणामुळे मुलाचे नाहक नुकसान झाले असून, संबंधित दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. या प्रकारामुळे सरकारी रुग्णालयातील शस्त्रक्रियांच्या विश्वासार्हतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
वैद्यकीय अधीक्षकांकडून चौकशी समितीची घोषणा
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विजयकुमार सरडे यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी माहिती दिली की, “या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, ज्या कोणाकडून हा हलगर्जीपणा झाला आहे, त्यांच्यावर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई केली जाईल.” सध्या या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.