Oxford University Press Apology: संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल वादग्रस्त लिखाण करणाऱ्या 'शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकाप्रकरणी अखेर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने जाहीर माफी मागितली आहे. तब्बल दोन दशकांनंतर आलेल्या या माफीनाम्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी पुकारलेल्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
2003 मध्ये अमेरिकन लेखक जेम्स लेन याने छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर आपल्या पुस्तकात छापला होता. या पुस्तकाचे प्रकाशन 'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस'ने केले होते. या लिखाणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. पुण्यात याचे तीव्र पडसाद उमटले असून, संभाजी ब्रिगेडने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ला केला होता. या प्रकरणामुळे राज्यात जातीय आणि राजकीय वातावरणही तापले होते.
छत्रपती उदयनराजेंच्या पत्राला 22 वर्षांनी उत्तर
दरम्यान, 2003 मध्येच छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला पत्र पाठवून या प्रकरणाचा निषेध नोंदवला होता आणि माफीची मागणी केली होती. तब्बल 22 वर्षांनी या पत्राची दखल घेत ऑक्सफर्डने अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. 'आम्ही छत्रपती उदयनराजे भोसले आणि महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल बिनशर्त माफी मागत आहोत,' असे या निवेदनात म्हटले आहे.
संभाजी ब्रिगेडचा सरकारला सवाल
ऑक्सफर्डने माफी मागितल्यानंतर आता संभाजी ब्रिगेड पुन्हा आक्रमक झाली आहे. संघटनेचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी म्हटले की, 'जेम्स लेनला चुकीची माहिती देऊन मदत करणाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. भांडारकर संस्थेतील त्या दोषी संशोधकांवर महाराष्ट्र सरकार आता तरी कारवाई करणार का?' असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
ऐतिहासिक लढ्याचा विजय –
तथापी, 2 दशकांच्या संघर्षाला अखेर यश आल्याने शिवप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवप्रेमी संघटनांनी सातत्याने या पुस्तकावर बंदी आणि माफीसाठी लढा दिला होता. नामांकित ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने नमतं घेत जागतिक स्तरावर महाराष्ट्राच्या अस्मितेचा स्वीकार केला आहे. या माफीनाम्यामुळे 22 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ऐतिहासिक सत्याचा विजय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.